बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळ असलेल्या रहीवासी परीसरात रासायनिक आणि ज्वलनशील साहीत्यांने भरलेली वाहने बेकायदेशीरपणे पार्कींग करण्यात येत असल्यामुळे दुर्घटना घडून नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बोईसर नवापूर मुख्य रस्त्यावर पार्कींग करून ठेवलेल्या एका ट्रकला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागून बाजूच्या दोन वाहनांसह एकूण तीन वाहने जळून खाक झाली. तर आगीच्या तीव्रतेमुळे शेजारील इमारतीमधील काही दुकानांचे नुकसान झाले असून राहीवाशांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता. मात्र अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

औद्योगिक क्षेत्राजवळील बोईसर नवापूर रस्त्यावरील संजय नगर येथे रिद्धी सिद्धी या वाणिज्य आणि रहीवासी इमारतीजवळ पार्कींग करून ठेवलेल्या वाहनाला मंगळवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या वाहनामध्ये ज्वलनशील रसायनाने भरलेली पिंपे असल्यामुळे आगीच्या क्षणार्धात रौद्ररूप धारण केले.

आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र ज्वलनशील रसायनामुले आगीची तीव्रता अधिकच वाढून बाजूला असलेली आणखी दोन वाहने जळून खाक झाली. त्याचबरोबर शेजारील रिद्धी सिद्धी इमारतीच्या तळमजल्यावर असलेली तीन दुकाने व वरच्या बाजूस असलेल्या वीजवाहक वाहीनीला देखील आगीची झळ बसल्याने नुकसानीसोबतच परीसरातील संपूर्ण वीजपुरवठा ठप्प झाला. आगीची तीव्रता अधिक असल्याने तारापूर अग्निशमन दलाच्या जवानांना तीन बंब आणि पाण्याचे दोन टँकर यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास तीन तासांचा अवधी लागला.

ज्वलनशील रसायनाची पिंपे भरलेले वाहन बोईसर नवापूर रस्त्यालगत उभे करून चालक संजय नगर येथील आपल्या घरी जेवण करण्यासाठी गेला असताना ही दुर्घटना घडली. वाहनाला लागलेल्या आगीची बोईसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून वाहनाचे चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

रहिवासी क्षेत्रात बेकायदा पार्किंग :

तारापुर औद्योगिक क्षेत्रात कायमस्वरूपी वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कारखान्यामध्ये ये जा करणारी मालवाहू वाहने औद्योगिक परीसराजवळील अवधनगर, धोडीपूजा, संजय नगर, यशवंतसृष्टी, कोलवडे, सालवड, बेटेगाव, मान या रहीवासी वस्ती असलेल्या ठिकाणी बेकायदेशीरपणे पार्कींग केली जातात. यापैकी अनेक वाहनांमध्ये रासायनिक घनकचरा आणि ज्वलनशील साहीत्य भरलेले असल्याने वाहनामध्ये स्फोट किंवा आग लागून नागरीकांच्या जिवीताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून पोलिसांनी धोकादायक साहीत्याची वाहतूक करणार्‍या वाहनांना बाजारपेठ आणि रहीवासी वस्तीजवळ वाहने उभी करण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी होत आहे.