पालघर : जगातील सर्व मोठ्या व प्रगत देशांनी आपल्या मूळ भाषेचे संवर्धन करण्यावर तसेच विस्तार करण्यावर भर दिला आहे. एक वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला गेल्याने राज्यात अभिजात भाषा दिवस व सप्ताह साजरा केला जात असल्याचे पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी प्रतिपादन केले.

अभिजात भाषा दिवस व सप्ताहाचा निमित्ताने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नरळे, साहित्यिक संगीतकार प्रसाद कुलकर्णी, हास्य कलाकार अजितकुमार कोष्टी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी मराठी भाषेचा वापर व विस्तार करण्यावर भर देत त्यासंदर्भात जनजागृती व प्रसिद्धी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. महाराष्ट्र केडर ची निवड केल्यानंतर आपण ही मराठी शिकलो असून प्रेमळ व मनाला जोडणारी ही भाषा असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांनी भाषा हा जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगत माता मातृभाषा याचे महत्त्व सांगत त्यावर प्रेम करणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. मराठी भाषेची वाटचाल सांगताना विविध संत, कवी, लेखक यांच्या साहित्याचा त्यांनी दाखला देत भाषेतील विविध सौंदर्य बाबत त्यांनी विवेचन केले. सध्या परिस्थितीला धरून त्यांनी दिलेली उदाहरणे, शेरोशायरी व कवितांना जमलेल्या शासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त दाद दिलेली. तर अजितकुमार कोष्टी यांनी त्यांच्या हलक्याफलक्या शैलीत उपस्थित आमचे मनोरंजन केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी राज्याची साहित्य संपदा व परंपरा याबद्दल माहिती देत इतिहासाचे संवर्धन व विकास व्हावा असे मत व्यक्त करत मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांनी केले तर आभार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी जिल्हा ग्रंथालय विभागातर्फे पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते.

मराठी भाषेच्या गौरवशाली परंपरेचा आणि सांस्कृतिक वैभवाचा उत्सव म्हणून अभिजात मराठी राजभाषा दिवस ३ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात झाला. हा सप्ताह ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे. त्याचा शुभारंभ देखील आज करण्यात आला.

शुभारंभ कार्यक्रमात मराठी भाषेचे महत्त्व, तिची लवचिकता आणि समाजाला एकत्र बांधण्याची ताकद यावर प्रकाश टाकण्यात आला.

साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांनी संत ज्ञानेश्वर, तुकारामांपासून ते आधुनिक काळातील लेखक-कवीं पर्यंतच्या साहित्यिक योगदानाचे दाखले देत मराठीच्या सामर्थ्याचा परिचय करून दिला. अजितकुमार कोष्टी यांनी आपल्या खुमासदार शैलीत मराठीचे दैनंदिन जीवनातील स्थान आणि तिची अनोखी लय स्पष्ट केली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा आणि विचारांचे सुंदर मिश्रण घडले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी वक्त्यांचे आणि कार्यक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “मराठी भाषेचा गौरव साजरा करणारा हा सप्ताह खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. अशा उपक्रमांमुळे आपली भाषा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल.”

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांचा संकल्प करत हा शुभारंभ सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. आठवडाभर विविध उपक्रमांद्वारे मराठी भाषेचा गौरव साजरा केला जाणार आहे. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.