पालघर : पावसाळ्यापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणद्वारे विद्युत तारांजवळील झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र या छाटणीनंतर निर्माण होणाऱ्या फांद्या महावितरण कडून उचलणे आवश्यक असताना ते उचलले जात नसल्याची तक्रार नगरपरिषद करीत आहे. तर अशा प्रकारचे काम पावसाळ्यापूर्वीच पूर्ण झाल्याचा दावा महावितरण करत असल्याने महावितरण व नगरपरिषदेमध्ये समन्वयाची आवश्यकता उद्भवत आहे.
पालघर नगरपरिषदेने केलेल्या तक्रारीनुसार महावितरणच्या वृक्ष छाटणीनंतर झाडांच्या फांद्या अनेकदा रस्त्याच्या कडेला किंवा पदपथांवर पडून राहतात. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो, तसेच अपघातांचा धोकाही वाढतो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महावितरणची असतानाही तो अतिरिक्त भार नगरपरिषदेवर पडत असल्याचे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
वृक्षांची छाटणी साधारणपणे मे-जून महिन्यातच पूर्ण झाली आहे. याबाबत मागील दोन महिन्यात काही तक्रारी आल्या होत्या. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देऊन ते उचलण्यात आले होते. सध्या असे कोणतेही काम सुरू नाही. मात्र असे काही आढळल्यास त्यावर योग्य उपाययोजना केली जाईल, असे महावितरणचे सुनील भारंबे यांनी सांगितले आहे.
समन्वयाची गरज
महावितरणने छाटणीचे काम पूर्ण झाल्याचे म्हटले असले तरी नगरपरिषदेसमोर असलेल्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक आहे. यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी महावितरण आणि पालघर नगरपरिषद यांच्यात अधिक चांगला समन्वय अपेक्षित आहे. छाटणीच्या कामाचे नियोजन करतानाच कचरा उचलण्याची आणि त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची कार्यप्रणाली निश्चित करणे गरजेचे आहे. दोन्ही यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास शहराची स्वच्छता राखली जाईल आणि नागरिकांना होणारा त्रासही कमी होईल.
महावितरण विभागाकडून छाटलेल्या फांद्या उचलण्याची पूर्णतः जबाबदारी ही संबंधित कर्मचाऱ्यांची असते. मात्र असे होत नसल्याने नागरिकांच्या निदर्शनास हा कचरा येऊन याबाबत नगर परिषदेवर आरोप केले जातात. नगरपरिषदेचे कर्मचारी उपलब्ध मनुष्यबळातून हा कचरा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. नगरपरिषदेने या संदर्भात महावितरणला पत्रव्यवहार करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. – भूषण कबाडे, आरोग्य विभाग, नगरपरिषद