पालघर : पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर देखील ग्राहक तक्रार निवारण आयोग हे ठाणे येथे कार्यरत असल्याने अनेक तक्रारींसाठी नागरिकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे फसवणुकीबाबत पोलीस ठाण्यात जाऊन नागरिकांना तक्रार दाखल करावी लागत असल्याने न्याय मिळण्यास देखील विलंब होत होता. मात्र मार्च महिन्यात पालघर येथे सुरू झालेल्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगमुळे नागरिकांना सोयीचे झाले असून गेल्या चार महिन्यात २८ तक्रारी दाखल झाल्या असून चार तक्रारींवर मागील महिन्यात निकाल लागला आहे.

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्यासाठी, केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण कायदा २०१९ लागू करण्यात आला आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार ग्राहकांच्या सुरक्षेकरिता कार्यरत असणारे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे १० मार्च पासून कार्यान्वित करण्यात आले आहे.

पालघर येथे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची स्थापना झाल्यापासून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आयोगाने अल्पावधीतच आपले काम सुरू केले असून, ठाणे येथून सुमारे ९५० जुनी तक्रार प्रकरणे पालघर जिल्हा ग्राहक आयोगाकडे वर्ग करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त आयोगाकडे नवीन २८ तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे यापैकी चार तक्रारींचे आतापर्यंत यशस्वीरित्या आणि तातडीने निवारण करण्यात आले आहे, जे आयोगाच्या कार्यक्षमतेचे द्योतक आहे.

आयोगाकडे दाखल झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक प्रमाण हे गृहनिर्माण क्षेत्रातील बिल्डर्सविरोधातील आहे. घर खरेदीदारांना अनेकदा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये ठरलेल्या वेळेत घराचा ताबा मिळत नाही, ज्यामुळे ग्राहकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होतो. मी, पूर्ण पैसे देऊनही बिल्डरकडून खरेदीखत करून दिले जात नाही, ज्यामुळे घराची कायदेशीर मालकी ग्राहकाला मिळत नाही, अनेकदा कोणताही कायदेशीर करारनामा नसतानाही बिल्डर ग्राहकांकडून मोठ्या रकमा घेतात, बिल्डर्स बेकायदेशीर बांधकाम करून ग्राहकांना अडचणीत आणतात या संदर्भात जनजागृतीच्या अभावामुळे अनेक नागरिक थेट पोलीस ठाणे गाठतात. मात्र, ही प्रकरणे दिवाणी स्वरूपाची असल्याने पोलिसांकडून त्यांना अपेक्षित मदत मिळत नाही, ज्यामुळे ते हवालदिल होतात.

पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग असल्याने येथील शेतकरी बांधवांना अनेकदा आपली फसवणूक झाल्यावर दाद कुठे मागावी याची कल्पना नसते. अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे किंवा निकृष्ट खते विकली जातात. यामुळे पीक येत नाही किंवा उत्पादनात मोठी घट होते, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होऊनही अनेकदा शेतकऱ्यांना मिळणारा पीक विमा कंपन्यांकडून नाकारला जातो ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. तसेच या फसवणुकीमध्ये आपण एक ग्राहक असून ग्राहक निवारण आयोगाकडे तक्रार करणे अभिप्रेत असताना शेतकरी मात्र यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांनी काय करावे

शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना ती तपासून घ्यावी. तसेच पेरणीनंतर पाकिटे जपून ठेवावीत. बियाणे किंवा खतांमध्ये फसवणूक झाल्यास बियाणे आणि खतांची पाकिटे ग्राहक निवारण कक्षात तक्रार करण्यासाठी कामी येऊ शकतात. पीक विमा नाकारला गेल्यास, त्याविरोधातही तुम्ही ग्राहक आयोगाकडे दाद मागू शकता.

सायबर गुन्ह्यात गोल्डन अवर्स महत्त्वाचे

डिजिटल युगात सायबर गुन्हेगारी एक गंभीर धोका बनली आहे. अनेकवेळा केवळ एका ओटीपीमुळे ग्राहकांचे लाखो-करोडो रुपयांचे नुकसान होते. सायबर फसवणुकीबद्दलही नागरिकांमध्ये पुरेशी जनजागृती नसल्याने फसवणूक झाल्यानंतर अनेकजण थेट पोलीस ठाण्यात जातात, पण ग्राहक निवारण कक्षातही याविरुद्ध दाद मागता येते हे त्यांना माहीत नसते. वेळेत तक्रार दाखल न केल्यामुळे “गोल्डन अवर” निघून जातो आणि बँकेकडून कारवाई होण्यापूर्वीच मोठे नुकसान होते. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ ग्राहक निवारण कक्षाशी संपर्क साधा.

जनजागृतीचे आव्हान आणि ग्राहकांनो, जागरूक रहा!

ग्राहक आयोगाचा मुख्य उद्देश ग्राहकांना न्याय मिळवून देणे, त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे आणि फसवणूक टाळणे आहे. ई-कॉमर्समधील फसवणूक, सदोष वस्तू किंवा सेवांमधील त्रुटी, आणि आर्थिक फसवणूक अशा सर्व प्रकारच्या ग्राहक समस्यांसाठी हा कक्ष महत्त्वाचा ठरत आहे. पालघर जिल्ह्याच्या दुर्गम स्वरूपामुळे आणि नागरिकांमध्ये माहितीच्या अभावामुळे या कक्षाबद्दलची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे. ठाण्याहून हा कक्ष पालघरला स्थलांतरित झाल्याची माहितीही अनेक नागरिकांपर्यंत न पोहोचल्याने पाहिजे तसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही.

आपली तक्रार कशी नोंदवाल?

ग्राहक आपली तक्रार प्रत्यक्ष भेट देऊन, ऑनलाइन किंवा दूरध्वनीद्वारे नोंदवू शकतात. तक्रार दाखल करताना बिलाची प्रत, वस्तूचे फोटो, संवादाचे पुरावे आणि इतर संबंधित कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशासकीय इमारत ब, दालन क्रमांक 101 मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाशी संपर्क साधा .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती कमी असल्याने छोट्या मोठ्या खरेदी पासून जमीन खरेदी पर्यंत त्यांची अनेक ठिकाणी फसवणूक होत असते. पालघर येथील ग्राहक निवारण कक्षात नागरिकांनी येऊन आपल्या फसवण्याची बाबत तक्रार दाखल करावी. – मंदाकिनी भोसले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अध्यक्ष