डहाणू : डहाणू तालुक्यातील चारोटी येथे मुले पळवून आणणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून टोळीने चिमुकल्यांना पळवून आणले असून याविषयी कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

चारोटी येथे गुरुवारपासून थांबलेल्या टोळीमधील पुरुष आणि महिला मराठी आणि लहान मुले हिंदी बोलत असल्यामुळे परिसरातील तरुणांना यांचा संशय होता. दरम्यान टोळीमध्ये शुक्रवारी आपापसात वाद निर्माण होऊन हाणामारी सुरू होती. यावेळी परिसरातील तरुणांनी भांडणे सोडवत चौकशी केली असता टोळीतील लोक मराठीमध्ये संभाषण करत असून लहान मुले हिंदी बोलत असल्यामुळे तरुणांना संशय आला. तरुणांनी अधिक चौकशी केली असता टोळीतील महिलांनी ही मुले अनाथ असून आम्ही त्यांचे पालन पोषण करत असल्याचे सांगत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी मुलांना विश्वासात घेत विचारपूस केली असता मुलांनी आम्हाला पळवून आणले असल्याची माहिती दिली.

हेही वाचा – पालघर जिल्ह्यात दुसरे मोठे बंदर

दरम्यान याठिकाणी गर्दी झाल्यामुळे गस्तीवर असलेले कासा पोलीस कर्मचारी याठिकाणी आले. तरुणांनी घटनेची माहिती पोलिसांना देत संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी टोळीतील सदस्यांची आणि मुलांची चौकशी केल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला आहे. यांनतर मुलांनी दिलेल्या फोन नंबर वर संपर्क करत पोलिसांनी मुलांच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना याविषयी माहिती दिली असता सूरज मिश्रा (८) आणि सत्यम मिश्रा (५) ही दोन मुले कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून हरवल्याची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

हेही वाचा- पालघरमध्ये रिलायन्सचा वस्त्रोद्याोग प्रकल्प; जमिनीच्या हस्तांतरासाठी एमआयडीसीचा अर्ज, दर मात्र गुलदस्त्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी मुले पळवणाऱ्या टोळीतील विनोद गोसावी, आकाश गोसावी, अंजली गोसावी आणि चंदा गोसावी राहणार कल्याण, जिल्हा ठाणे यांना अटक केली आहे. कल्याण पोलिसांशी संपर्क झाल्यानंतर पालघर पोलिसांतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली टोळी आणि मुलांना कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती कासा पोलीस ठाणे प्रभारी अविनाश मांदळे यांनी दिली.