बोईसर : वसई विरार परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी विक्रमगड तालुक्यात देहरजी धरणाची निर्मिती करण्यात येत आहेत. धरणाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून पहिल्याच पावसात धरणात पाच टक्के पाणीसाठा साध्य करण्यात यश आले आहे.

देहरजी धरणाची ९५.६० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने नियमित हजेरी लावल्याने २२ जून रोजी देहरजी धरणातील पाण्याने ५.१४७ दशलक्ष घनमीटरची पातळी गाठून एकूण साठवण क्षमतेच्या पाच टक्के हे धरण भरले आहे. धरणाच्या जलसाठ्याची सापेक्ष पातळी ९०.०० मीटरपर्यंत वाढली. त्यामुळे स्पिलवेवरून १०९.१४ दशलक्ष घनमीटर/सेकंद या गतीने विसर्ग करण्यात आला. धरणात पाणी साठण्याची ही पहिलीच वेळ असून धरणाची कार्यक्षमता तसेच त्याच्या बांधकामाचा भक्कमपणा सिद्ध झाल्याचा दावा एमएमआरडीए मार्फत करण्यात आला आहे.

धरणाच्या ९० मीटर सापेक्ष पातळीपर्यंत अंशतः जलसाठा निर्माण झाला आहे. या ठिकाणी नदीच्या तळाच्या ६६.३६ या सापेक्ष पातळीशी तुलना करता धरणामध्ये सुमारे २३.६४ मीटर इतकी पाण्याची सापेक्ष खोली साध्य करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीए कडून देण्यात आली.

पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळून वाहणाऱ्या देहरजी नदीवर देहरजी धरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. धरणामुळे विक्रमगड तालुक्यातील खुदेड, साखरे आणि जांभे गावातील २६९ कुटुंबे बाधित होणार आहेत. बाधित कुटुंबांचे वाडा तालुक्यातील खरीवली गावात पुनर्वसन करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत बांधकामासाठी माती व दगडांचा वापर केला असून एमएमआरडीए मार्फत २५९९.१५ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकण पाटबंधारे विभागामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन २०२७ च्या अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून प्रकल्प सुरु झाल्यानंतर देहरजी धरणातून दर दिवशी २५५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जाणार असून त्यामध्ये वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला सर्वाधिक १९० दशलक्ष लिटर, पालघर सिडको क्षेत्र ५० दशलक्ष लिटर आणि पाणी पुरवठा मार्गावर असलेल्या ग्रामीण भागांसाठी १५ दशलक्ष लिटर असे पाण्याचे नियोजन असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये :

एकूण साठवण क्षमता: ९५.६० दशलक्ष घनमीटर
वापरयोग्य साठवण: ९३.२२ दशलक्ष घनमीटर (२५५ दशलक्ष लिटर प्रति दिवस)
मुख्य धरण : लांबी – २४५० मीटर | उंची – ७१.६० मीटर
स्पिलवे : लांबी – ६१.७५ मीटर, ४ रेडियल गेट्स (प्रत्येकी १२ मीटर x ६.५ मीटर)