बोईसर : पावसाळा तोंडावर आला असताना बोईसर परिसरातील मोठ्या नाल्यांच्या सफायला अजूनही सुरुवात करण्यात आलेली नाही. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि प्लास्टिक युक्त कचरा साठून राहिल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
बोईसर आणि परिसरातील सरावली, खैरेपाडा, सालवड, पास्थळ ग्रामपंचायत हद्दीमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या मोठ्या नाल्यांना सध्या गटाराचे स्वरूप आले आहे. बेशिस्त नागरीकांकडून नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आणि कचरा फेकण्यात येतो. त्याचप्रमाणे नाल्यांवरती आणि दोन्ही बाजूला अतिक्रमण करून मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली असून यामुळे नाले अरुंद बनून आक्रसले आहेत. नाल्यांमधील साचलेला गाळ, झाडीझुडुपे, गवत, प्लास्टिक आणि कचरा तसेच अनधिकृत बांधकामे इत्यादी कारणांमुळे जागोजागी पावसाचे पाणी वाहून नेण्यास अडथळा येत नागरीकांच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना ग्रामपंचायत विभागांकडून अजूनही नालेसफाईला सुरवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे भीमनगर, साईबाबा नगर, सिडको, संजय नगर, धोडीपूजा या परिसरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीकडून नालेसफाईला विलंब होत असताना एमआयडीसीने नात्र त्यांच्या हद्दीतील नाल्यांमधील तुंबलेला गाळ आणि कचरा काढण्यास सुरवात केली आहे.
बोईसर शहराच्या उत्तर दिशेला असलेल्या राणीशिगाव, नेवाळे, शिगाव, महागाव, परिसरातून उगम पावलेले नैसर्गिक नाले, ओहोळ यांच्यामाध्यमातून वाहत आलेले पावसाचे पाणी बोईसर परिसरातून वाहत जात पुढे खाडीमार्गे समुद्राला जाऊन मिळते. पावसानंतर पाण्याचा प्रवाह आटल्यानंतर भीमनगर, गणेश नगर, दांडीपाडा, धोडीपूजा, संजय नगर, खैरेपाडा, पास्थळ परिसरातून वाहणाऱ्या नाल्यांना घरगुती सांडपाण्यामुळे गटाराचे स्वरूप प्राप्त होते. ग्रामपंचायत प्रशासनाकडून पावसाळापूर्वी या नाल्यांची व्यवस्थित सफाई करण्यात येत नसल्यामुळे वर्षभर या नाल्यांमध्ये कचरा साचून दुर्गंधी व रोगराई पसरते. खैरेपाडा आणि बेटेगाव येथून वाहणाऱ्या नाल्यात प्रदुषणामुळे जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पाण्यातील जैवविविधता संपुष्टात येत असून सध्या गटारे आणि लहान नाल्यांच्या सफाईला सुरुवात करण्यात आली असून त्यानंतर मोठे नाले यांची सफाई केली जाणार आहे. पावसाळ्याच्या आधी नालेसफाईचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती बोईसर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांनी दिली.
एमआयडीसी परिसरात नालेसफाई सुरू :
पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामपंचायत हद्दीमधील नाले सफाईस विलंब होत असताना तारापूर औद्योगिक क्षेत्रातून वाहणाऱ्या नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली आहे. जेसीबीच्या सहाय्याने नाल्यांमधील गाळ आणि तुंबलेला इतर कचरा बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली लावण्याचे काम सुरू आहे.
नैसर्गिक नाल्यांवर अनधिकृत बांधकामे :
बोईसर आणि परिसरातून वाहणाऱ्या नाल्यांवर अतिक्रमण करून मोठ्या संख्येने अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. अनधिकृत बांधकामामुळे नाले अरुंद होत आहेत. ओसवाल परिसरात विकासकाने नाल्यावर बांधकाम करून संपूर्ण नालाच भूमिगत करून टाकला आहे. यामुळे अमेय पार्क आणि संजय नगर परिसरातील रहिवाशांना दरवर्षी पूर परिस्थितीचा सामना करावा लागतो.