बोईसर : पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या संततधारेने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. सूर्या प्रकल्पअंतर्गत धामणी धरणात २२८ दशलक्ष घनमीटर (८२ टक्के) पाणीसाठा निर्माण झाला असून धरणातील पाण्याची पातळी स्थिर राखण्यासाठी शुक्रवारी धरणाचे तीन दरवाजे ४० सेंटीमीटरने उघडण्यात येऊन सूर्या नदीपात्रात १४ हजार ३३७ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.

गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर अधिकच वाढला असून मागील २४ तासात २५४ मिमी पाऊस पडला. सूर्या धरण प्रकल्प क्षेत्रात आत्तापर्यंत एकूण १५३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे रविवारी सकाळी सूर्या धरणाचे सर्व पाच दरवाजे ४० सेंटीमीटरने उघडण्यात येऊन ४०६१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धामणी धरणातून कवडास बंधाऱ्यात येत असलेल्या पाण्यामुळे कवडास बंधारा ४४.७७ टक्के भरला असून बंधाऱ्याच्या सांडव्यावरून सूर्या नदीपात्रात सुमारे ४५००७ क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामुळे सूर्या नदीला मोठा पूर आला असून डहाणू आणि पालघर तालुक्यातील दोन्ही काठांवरील वाघाडी, वेती, कासा, वरोती, चारोटी, घोळ, भराड, निकावली, आंबिवली, धामटणे, पेठ, म्हसाड, उर्से, नानिवली, साये आंबिस्ते, आकेगव्हाण, चिंचारे, गारगाव, बोरशेती, किराट, माकडचोळा, लालोंडे, गुंदले, नागझरी, निहे, लोवरे, गिरनोली, सागावे, काटाळे, कोकणेर, मासवन, चहाडे, वसरे, विश्रामपूर, लालठाने, तांदुळवाडी, पारगाव, नावजे, गिराळे या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या स्थितीनुसार सूर्या नदीपात्रात करण्यात येणाऱ्या विसर्ग मध्ये कमी अधिक प्रमाणात बदल करण्यात येणार असल्याची माहिती पालघर पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे.