डहाणू :पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मौजे सुकडआंबा येथील शिरसोनपाडा वस्तीवर जल जीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या उंच पाण्याच्या टाकीच्या लँडिंग स्लॅबचा एक भाग कोसळून काही महिन्यांपूर्वी दोन शाळकरी विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर एक मुलगी जखमी झाली होती. या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उलटल्यानंतर जिल्हा परिषद पालघरने तातडीने कठोर कारवाई केली आहे.
या घटनेच्या चौकशीसाठी शासनाकडून व्ही. जे. टी. आय. या संस्थेची स्ट्रक्चरल ऑडिटसाठी नियुक्ती करण्यात आली होती. प्राप्त स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात संबंधित जलकुंभांच्या संरचनेत गंभीर बांधकाम दोष आढळून आले. या अहवालाच्या आधारे, जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी संबंधित कंत्राटदारास तीनही साठवण टाक्या पाडून नव्याने बांधण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत.
तसेच या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंत्राटदाराला काळ्या यादीत समाविष्ट करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे, ज्यामुळे भविष्यात त्याला कोणत्याही शासकीय योजनांची कामे घेता येणार नाहीत. जिल्हा परिषदेने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
पालघर जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत असून सुखडआंबा येथील घटनेमुळे योजनांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे. सुखडआंबा येथील घटनेविषयी डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केल्यामुळे या कामाच्या ठेकेदारावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी योजनेचे काम निकृष्ट पद्धतीने झाले असून यासाठी योजनांची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.