पालघर : मुरबे येथे प्रस्तावित असलेले बहुउद्देशीय बंदर समुद्रात होणार असून शासकीय जागेचा करार शासनाबरोबर झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे सर्व्हेचा प्रस्ताव आल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना माहिती दिली जाईल आणि या विषयावर जनसुनावणी घेतली जाईल, ज्यात सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार असेल असे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी स्पष्ट केले.
पालघर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांना घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत मुरबे येथील प्रस्तावित असलेल्या बहुउद्देशीय बंदराबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाचे वातावरण दूर करण्याची मागणी शिवसेनेने केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वाढवण बंदरामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमार गावांच्या यादीत दांडी, उच्छेळी, नवापूर आणि झाई या गावांचा समावेश करण्याची मागणी केली. या गावातील मच्छीमार क्षेत्र बाधित परिसरात येत असल्याने त्यांनाही नुकसान भरपाई मिळायला हवी, अशी भूमिका शिवसेनेने यावेळी मांडली. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात, विशेषतः भरतीच्या वेळी बंदरपट्टी भागातील घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या सर्व भागाचा पूर्णतः सर्व्हे करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज शिवसेनेने व्यक्त केली.
पालघर जिल्ह्यातील ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याबाबत शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे जनतेमध्ये असंतोष असल्याचे निदर्शनास आणून देत स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती थांबवावी अन्यथा शिवसेना याविरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.
मुंबई-अहमदाबाद रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे होणारी वाहतूक कोंडी, तारापूर औद्योगिक वसाहत आणि पालघर जिल्ह्यातील समुद्र व खाडीतून होणारे जलप्रदूषण, तसेच हवेतील वायू प्रदूषण याकडे शिवसेनेने लक्ष वेधले. तसेच गेल्या दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण आदिवासी भागातील लोकांना तातडीने भरपाई मिळवून देण्याची मागणीही करण्यात आली. शिवसेनेच्या शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह उपनेत्या ज्योती मेहेर, सह संपर्कप्रमुख केदार काळे, जिल्हा संघटिका वैदेही वाढाण, माजी आमदार अमित घोडा, शिवसेना पदाधिकारी हेमंत धर्ममेहेर, सुनील इभाड, संजय चौधरी, राहुल घरत, आदित्य अहिरे, विविध सरपंच, लोकप्रतिनिधी, मच्छीमार सोसायटीचे पदाधिकारी, तसेच शिवसेनेचे जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
शिवसेनेच्या शिष्ठमंडळाबरोबर चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले. काही महत्त्वाच्या विषयांवर स्वतः पुढाकार घेऊन लक्ष देण्याचे आश्वासनही त्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.