पालघर तालुक्यातील केळवे समुद्रकिनारी चार जणांचा समृद्रात बुडून मृत्यू झालाय. आज दुपारी घडलेल्या या दुर्घटनेमध्ये एका स्थानिक मुलासह नाशिक येथील तीन पर्यटक तरुणांचा बुडून मृत्यू झाला.

नाशिक येथील जेईई व नीट परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेणाऱ्या कोंकर अकॅडमीचे २९ विद्यार्थी व पाच शिक्षकांचा केळवे येथे लक्झरी बसने एक दिवसीय सहलीसाठी दुपारी पोहोचले होते. समुद्रकिनारी खेळत असताना केळवे येथील काही लहान मुलं बुडत असल्याचे पाहिल्यानंतर नाशिक येथील पर्यटक विद्यार्थ्यांनी त्यांच्या बचावासाठी धाव घेतली. याच दरम्यान भरती संपून ओहोटी सुरू झाल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने हे तरुण समुद्रात खेचले गेले.

समुद्रकिनारी असणाऱ्या दिलीप तांडेल या जीवन रक्षका सह (लाईफ गार्ड) सह सुरज तांडेल, भूषण तांडेल, दिलीप तांडेल, शाहीर शेख, प्रथमेश तांडेल या टांग्याचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांनी बुडणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पट्टीचा पोहणारा अखिलेश देवरे याला वाचवण्यात यश आले आहे. केळवा देवीपाडा येथील अथर्व मुकेश नागरे (वय १३) यांच्यासह नाशिक येथील ओम विसपुते, दीपक वडाकते व कृष्णा शेलार यांचा बुडून मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनास्थळी पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनील शिंदे, पोलीस व महसूल यंत्रणेचे अधिकारी पंचानामा करुन गेले. चारही मृतदेहांचे शवविच्छेदन माहीम प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्यानंतर मृतदेह मृतांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येतील असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत खंडारे यांनी सांगितले.