पालघर: गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात तयार होणारे निर्माल्य जमा करण्याकरिता व त्याची योग्य प्रकारे व्यवस्था करून खत निर्मिती करिता नगरपरिषदेकडून यंदा नगरपरिषद क्षेत्रात दोन निर्माल्य संकलन गाड्या फिरणार आहेत. यासह पर्यावरणाच्या दृष्टीने दोन कृत्रिम तलावांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात पर्यावरणाकडे देखील विशेष लक्ष देण्याच्या उद्देशाने नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम गणेशोत्सव काळात राबविण्यात येणार आहेत. सणासुदीच्या काळात पूजेदरम्यान वापरण्यात आलेले फुल, पत्री याची योग्य विल्हेवाट करण्यात यावी याकरिता विसर्जन घाटावर निर्माल्य कलश ठेवण्यात येत असतात. मात्र तरीही गणेशोत्सव काळात मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होऊन त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते.
विसर्जनाच्या दिवसापर्यंत ते निर्माल्य मोठ्या प्रमाणात खराब होत असल्याने यंदा नगरपरिषदेने निर्माल्य संकलन गाड्या सुरू केल्या आहेत. या दोन गाड्या नगरपरिषद क्षेत्रातील गणेश मंडळांमध्ये जाऊन त्यांच्याकडे असलेले निर्माल्य दररोज जमा करून त्याची खत प्रक्रियेसाठी साठवणूक करणार आहे. यामुळे अधिककाळ पडून राहण्याची किंवा इतरत्र कचऱ्यात टाकण्याची समस्या यंदा संपणार आहे.
घंटागाड्यांना दिले निर्देश
निर्माल्य टाकण्याकरिता व्यवस्था नसल्याने अनेकदा नागरिकांकडून घंटागाड्यांमध्ये निर्माल्य टाकण्याची वेळ येते. त्यामुळे कचऱ्यात निर्मल्य जाऊ नये या उद्देशाने तसेच नागरिकांना देखील निर्माल्य योग्य प्रकारे विल्हेवाट लावता यावी याकरिता घंटागाड्यांना निर्माल्या करिता वेगळी थैली ठेवण्याचे निर्देश दिले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे निर्माल्य कचऱ्यात जमा होणार नाही.
नगरपरिषद क्षेत्रात दोन कृत्रिम तलाव
दीड दिवसापासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन घाटात विसर्जित होत असतात. तर अनेक नागरिक विसर्जन घाटा व्यतिरिक्त कृत्रिम तलावांना प्राधान्य देतात. या अनुषंगाने नगर परिषदेकडून यंदा वसंतराव नाईक चौक समोर आणि नवली समाज मंदिर या दोन ठिकाणी कृत्रिम तलावांचे आयोजन केले आहे. घरगुती व लहान गणेश मुर्त्या कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.
विसर्जन घाटांची स्वच्छता
पालघर येथील गणेश विसर्जनाचे मुख्य ठिकाण गणेशकुंड व नवली तलाव या ठिकाणी आरोग्य विभागाकडून गेल्या 15 ते 20 दिवसांपासून स्वच्छता मोहीम सुरू होतील. यामधील शेवाळ, जुन्या मुर्त्यांचे भाग व इतर कचरा काढून विसर्जन घाट स्वच्छ करण्यात आले आहेत. यासह गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटाची पाणी पातळी देखील वाढली असल्याने विसर्जन व्यवस्थित होणार असल्याचे आश्वासन नगरपरिषदेने दिले आहे.
खड्डे भरण्याचे काम सुरू
कालपासून पालघर शहरात सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन सुरू झाले आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून असलेले खड्ड्यांचे विघ्न यंदा देखील गणपती आगमनाला कायम असून काही ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून खडी टाकण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी अनेक रस्ते अद्यापही खड्डेमय आहे. तर खड्डे भरायचे काम सुरू असल्याचे नगरपरिषद अभियंता गौरव साळुंखे यांनी सांगितले आहे.