पालघर : आदिवासी विभागाच्या निवासी योजनेत इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश देण्याच्या योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या पाचगणी येथील ब्लूमिंगडेल स्कूल व्यवस्थापनाने त्यांच्याकडील प्रवेशित ६५ विद्यार्थ्यांना नाकारल्याने दहावी उत्तीर्ण झालेल्या ३९ विद्यार्थ्यांसमोर अन्य शैक्षणिक संस्थेत समायोजनाद्वारे ११ वी च्या प्रवेशाचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. या समायोजनाबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

सन २०१२- १३ पासून राज्य शासनाच्या आदिवासी विभागाच्या निवासी योजनेत इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षण देण्याच्या महत्त्वकांक्षी योजनेत अजूनपर्यंत ४१३२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी १४७६ विद्यार्थी बारावी इयत्ता उत्तीर्ण झाले असून त्यापैकी २३६ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश रद्द करून इतर शाळांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रयोजन केले होते. विद्यमान शैक्षणिक वर्षात (२०२५- २६) राज्यातील २० नामांकित शाळेत १५३४ मुलांसह एकूण २५९९ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालय जव्हार येथून देण्यात आली आहे.

दरम्यान पाचगणी येथील ब्लूमिंगडेल स्कूल या नामांकित शाळेमध्ये गेल्या वर्षी ७० विद्यार्थी दाखल होते. त्यापैकी पाच विद्यार्थी १२ इयत्ता उत्तीर्ण झाले असून उर्वरित ६५ विद्यार्थ्यांना नामांकित शाळा योजनेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना या शाळेने नाकारले आहे. यापैकी चौथी इयत्तेतील चार व दहावी इयत्तेतील २२ अशा एकूण २६ विद्यार्थ्यांना पाचगणी येथील नॅशनल पब्लिक स्कूल मध्ये समायोजन करण्यात आले आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या ३९ विद्यार्थ्यांना अकरावी इयत्तेकरिता समायोजनाबाबत प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती जव्हार येथील प्रकल्प कार्यालयातून देण्यात आली आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांना नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेश दिला जाईल असा विश्वास प्रकल्प कार्यालयातील या विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान पाचगणीच्या नॅशनल पब्लिक स्कूल मध्ये प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना जव्हार येथून घेऊन जाण्यासाठी २९ जून रोजी विशेष बस येणार असल्याची सूचना संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना प्राप्त झाला आहे.

ब्लूमिंगडेल स्कूल ने प्रवेश का नाकारला ?

ब्लूमिंगडेल स्कूल मध्ये २०१५- १६ पासून जव्हार प्रकल्पा च्या १६५ विद्यार्थ्यांसह इतर प्रकल्पातील विद्यार्थी नामांकित योजनेअंतर्गत प्रवेशित करण्यात आले होते. त्यानंतर इयत्ता बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्याने या शाळेत जव्हार प्रकल्पातील फक्त ६५ विद्यार्थी शिल्लक राहिले होते. मर्यादित विद्यार्थी संख्येसाठी शिक्षक नियुक्ती करणे त्यांचा पगार निवासाची सुविधा तसेच वाढलेली महागाई यामुळे या शाळेने नामांकित योजनेअंतर्गत विद्यार्थी घेण्याचे बंद केले. या शाळेत सद्यस्थिती नामांकित योजने व्यतिरिक्त इतर दहावी व बारावी इयत्तेचे विद्यार्थी असल्याची माहिती पुढे आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नामांकित योजनेद्वारे प्रति विद्यार्थी किती निधी दिला जातो ?

१८ मे २०१८ च्या शासन निर्णयानुसार या योजनेत सहभागी होणाऱ्या शाळेचे गुणांकन करून ज्या शाळांना ८० पेक्षा अधिक गुण मिळाले आहे अशा इंग्रजी माध्यमांच्या शाळाला प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी ७० हजार रुपये शुल्क अदा करण्यात येत असून उर्वरित शाळांना गुणांकणाप्रमाणे ५० ते ६० हजार रुपये प्रति विद्यार्थी प्रति वर्ष शुल्क अदा करण्याची मुभा निशित करण्यात आली आहे.