पालघर : समर्पित मालवाहू रेल्वे मार्गासाठी नवली फाटक बंद करण्यात आल्याने पालघर पूर्वेकडील अनेक नागरिक नवली फाटकातून धोकादायक पायवाट काढत आहे. एकीकडे रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल कार्यरत होण्याची दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत, तर दुसरीकडे पर्यायी भुयारी मार्गात साचलेले पाणी आणि अपूर्ण काम यामुळे हजारो स्थानिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये मोठा अपघात होण्याची भीती संभावत आहे.
पालघर पूर्व पश्चिमेला जोडणारी नवली रेल्वे फाटक १० एप्रिल २०२५ रोजी कोणत्याही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. तर नवली, लोकमान्य नगर व नवली फाटकाच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दोन ते तीन किलोमीटरचा वळसा घालून राष्ट्रीय महामार्ग व छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वळसा घालावा लागत आहे. तर दक्षिणेकडे नवली रेल्वे फाटका पासून जवळपास ५०० मीटर अंतरावर दिलेल्या पर्यायी भुयारी मार्गात देखील पावसाळ्यात पाणी साचत असून प्रवास गैरसोयीचा ठरत आहे.
नवली रेल्वे फाटकाच्या पश्चिमेला अवघ्या ५०० मीटर अंतरावर शाळा, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, शासकीय आरोग्य केंद्र आणि दैनंदिन बाजारपेठ असल्याने पूर्वेकडील नवली, वेवूर, डॉ. आंबेडकरनगर, भीमाईनगर, कमारे, वरखुंटी, भोगोलेपाडा अशा सुमारे १० हजार लोकवस्तीच्या अनेक गावांमधील शेकडो ग्रामस्थ, विद्यार्थी आणि नोकरदार यांना दररोज या फाटकातून ये-जा करावी लागते. हे फाटक बंद झाल्याने त्यांची दैनंदिन जीवनशैली पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
नागरिकांना होणारा त्रास
साचलेल्या पाण्यातून पायी किंवा दुचाकीवरून मार्ग काढणे अत्यंत धोकादायक बनले आहे. पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तोल जाऊन वाहून जाण्याची किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. अशा वेळी या मार्गातून प्रवास करणे म्हणजे अपघातांना आमंत्रण देण्यासारखे आहे. अचानक गाडी आल्यास किंवा पाण्यातून मार्ग काढताना अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती ग्रामस्थांना सतावत आहे.
विद्यार्थी आणि नोकरदारांना वेळेवर शाळेत किंवा कार्यालयात पोहोचणे कठीण झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे शाळेच्या गणवेशाचे आणि सामानाचे नुकसान होते.
दूषित पाण्यातून रोज ये-जा केल्याने त्वचाविकार आणि इतर साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे.
धोकादायक मार्गातून प्रवास करताना अधिक वेळ लागतो, ज्यामुळे नागरिकांचा अमूल्य वेळ वाया जातो.
पर्यायी भुयारी मार्गाला ओहोळाचे स्वरूप
रेल्वे प्रशासनाने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला पर्यायी भुयारी मार्ग म्हणजे नागरिकांच्या त्रासात भरच आहे. हा मार्ग बांधताना रस्त्याची योग्य उंची राखली नाही आणि पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही. यामुळे पहिल्याच पावसात या पर्यायी मार्गावर तीन फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आणि या रस्त्याला वाहत्या नाल्याचे स्वरूप आले.
प्रशासनाच्या आश्वासनांचा भंग
पूर्वेकडील ग्रामस्थांनी रेल्वेफाटक बंद करण्यास विरोध दर्शविला असताना रेल्वे प्रशासनाने जिल्हा प्रशासन आणि ग्रामस्थांना या फाटकावरील उड्डाणपुलाचे काम १५ जून २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे लिखित आश्वासन दिले होते. परंतु रेल्वे प्रशासनाने दिलेली ही कालमर्यादा संपूनही कामाची गती मंदच आहे. कामाची सद्यस्थिती पाहता हा पूल वाहतुकीसाठी सुरू होण्याकरिता अजून काही महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागणार असे स्पष्ट दिसते. ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्हा आणि रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास या समस्या आणून दिल्या आहेत, परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाचा हा निष्काळजीपणा नागरिकांच्या जिवावर बेतत आहे.
रेल्वे प्रशासनाचे म्हणणे
पश्चिम रेल्वेने यावर स्पष्टीकरण दिले असून उड्डाणपुलाचे काम समर्पित फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) बाजूने पूर्ण झाले आहे, तर पुलावरील रस्त्याकडे जाण्याचे काम अजूनही प्रगतीपथावर आहे. सध्या लोकांसाठी तात्पुरता उतारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पादचाऱ्यांसाठी फाटक क्रमांक ४६ए च्या जागी रस्त्यावरची पादचारी मार्गाचे काम पूर्ण झाले असून ती ७ जुलै २०२५ खुला करून देणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.