पालघर : डहाणू तालुक्यातील कैनाड परिसरात प्लॉट वितरण करण्याच्या योजनेत १० ते १५ नागरिकांकडून प्रत्येकी ४० लाख रुपये घेऊन योजना राबविणारा मुख्य प्रवर्तक गेल्या काही महिन्यांपासून फरार झाला आहे. या प्रकरणात योजनेतील स्थानिक संचालकांना पोलिसांनी अटक केली असून या योजनेच्या सूत्रधाराला पकडण्यासाठी पालघर पोलीस प्रयत्नशील आहेत.

तुळजाभवानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालया अंतर्गत नोंदणीकृत कंपनीने डहाणू कैनाड परिसरात रहिवासी संकुलासाठी कैनाड मेरीपाडा येथे प्लॉट विकसित करून देण्याचा एक यशस्वी प्रकल्प राबविल्यानंतर जून २०२२ मध्ये १०-१२ गुंठे क्षेत्रफळाचा प्लॉट व परिसरात मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी ६२ प्लॉट्स योजना बनविण्यात आली होती. त्यापैकी काही गुंतवणूकदारांनी प्लॉट खरेदी करून ४० लाख रुपये जून २०२२ मध्ये जमा केले होते.

गुंतवणूक केल्याच्या बदल्यात प्लॉटचे हस्तांतर सहा महिन्यात करण्याच्या बरोबरीने त्यासोबत योजनेत सहभागी होण्यासाठी भरलेले काही पैसे परत देणे तसेच एक आलिशान चार चाकी वाहन अथवा २५ लाख रुपये देण्याचे निश्चित केले होते. मात्र प्रत्यक्षात सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर वेगवेगळी कारण पुढे करून तसेच व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगत प्लॉट योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींना भावनात्मक संदेश पाठवून पैसे देण्यास विलंब होत असल्याबद्दल गुंतवणूकदारांना ताटकळत ठेवण्यात आले.

यासंदर्भात काही प्लॉट खरेदीदारांनी डहाणू कैनाड येथील कार्यालयात गेल्यानंतर त्यांना भरलेली रक्कम परत करण्याचे आश्वासन वारंवार देण्यात आले. प्रत्यक्षात योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी रक्कम जमा करताना त्यांच्यासोबत दोन स्थानिक संचालकांच्या माध्यमातून नोटरीकडे नोंदणीकृतकरारनामा करण्यात आला होता.

या कंपनीचे पालघरचे कार्यालय बंद पडल्यानंतर काही महिन्यांनी डहाणू येथील कार्यालय देखील बंद करून या योजनेत मुख्य भूमिका बजावणारे जयवंतराव नलावडे असे नाव सांगणारी व्यक्ती देखील गुंतवणूकदारांच्या संपर्कापासून दूर गेली. या प्रकरणात काही गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर करारनामा करणाऱ्या स्थानिक संचालकांना अटक करण्यात आली असली तरी मूळ सूत्रधार अजून पर्यंत फरार असल्याचे दिसून आले आहे.

या कंपनीने कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातून आपली नोंदणी रद्द केली असून (स्ट्राइक ऑफ) असे करताना गुंतवणूकदारांचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच त्या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली नसल्याकडे गुंतवणूकदारांनी लक्ष वेधले आहे. शिवाय या योजनेत प्रसिद्धी मिळवण्यासाठी सीने कलाकारांना व स्थानिक पुढाऱ्यांना बोलवून लकी ड्रॉ कार्यक्रम आयोजित केल्याचे देखील गुंतवणूकदाराने लक्ष वेधले आहे.

अनेक गुंतवणूकदार यांनी खाजगी संस्थांमधून कर्ज घेऊन या योजनेत आपले योगदान दिले असून गेल्या तीन वर्षांपासून आपण गुंतवणूक केलेल्या रकमेचा मोबदला अथवा परतफेड करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या संदर्भात पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता गुंतवणूकदारांशी करारनामा केलेल्या स्थानिक संचालकांना पोलिसांनी अटक केली असली तरीही मूळ सूत्रधाराचा शोध पोलीस घेत असल्याचे सांगितले.

या प्रकरणातील मूळ सूत्रधाराने खोट्या नावाचा वापर करून पालघर जिल्ह्यात वावर केल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून या गुंतवणूक योजनेत सध्या तरी १०-१२ गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे आली आहे. या जमीन विक्री घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या कंपनीच्या नावे असणारी सुमारे दीड कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत करत त्यावर टाच आणली असून या प्रकरणाची चौकशी पालघर जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जात आहे अशी माहिती लोकसत्ता ला दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या योजनेत फसवणूक झाली असल्यास संबंधिताने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवण्याचे आवाहन पालघरच्या पोलीस अधीक्षक यांनी करून या गैरव्यवहारातील सूत्रधाराला लवकरच अटक करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.