डहाणू : तलासरी पोलिस ठाणे हद्दीत २० जुलै रोजी तलासरी इभाडपाडा येथील तास्कंद हॉटेलजवळ गांजाची खरेदी-विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन व्यक्तींना तलासरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४६,६६० रुपये किमतीचा २.३३० किलोग्रॅम गांजा, २९,५०० रुपयांची रोकड, दोन मोबाईल फोन आणि दोन दुचाकी असा एकूण ३,९४,१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदारामार्फत इभाडपाडा येथील तास्कंद हॉटेलजवळ दोन व्यक्ती गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पोलिसांनी दोन पंच, वजनकाटा करणारा व्यक्ती आणि फोटोग्राफर यांना सोबत घेऊन दोन पोलीस पथके तयार केली.

तास्कंद हॉटेलजवळ सापळा रचून बसले असता, दोन संशयित व्यक्ती दुचाकीवर हॉटेल परिसरात आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडून २.३३० किलोग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला. याप्रकरणी संतोष दुर्योधन स्वाईन वय ३८, रा. तलासरी, सुतारपाडा आणि बापटीस्ट नवसु धोडी वय २४, रा. खेरडी खाडीपाडा, दादरा नगर हवेली (केंद्र शासित प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कारवाईमध्ये ४६,६६० रुपयांचा गांजा सदृश्य वनस्पती, २९,५०० रुपयांची रोकड, दोन मोबाईल फोन आणि दोन दुचाकी मोटारसायकल असा एकूण ३,९४,१६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात आली असून, पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय गोरड आणि उपनिरीक्षक अमोल चिंधे करत आहेत.