पालघर: सफाळा येथील रेल्वे फाटक बंद करताना येथील नागरिकांना पर्याय उपलब्ध करून दिला नाही. या अनुषंगाने सफाळा विकास कृती समितीच्या वतीने सुरू केलेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी सुरू राहिले आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सफाळे विकास कृती समिती व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. सफाळा रेल्वे स्थानकात उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचे, सरकता जीना व उद्धवाहकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
सफाळा येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्यासोबत आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपजिल्हाधिकारी महेश सागर तसेच पश्चिम रेल्वे, समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग, मुंबई विकास रेल कॉर्पोरेशन चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रेल्वेच्या अंतर्गत विभागात समन्वयाचा अभाव असल्याने सफाळे येथील पादचारी पुल उभारण्याच्या कामी दिरंगाई झाल्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रथमदर्शनी मान्य केले. पादचारी फुल व इतर सुविधा उभारण्यासाठी आवश्यक परवानगी देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सहकार्य करत असल्याचे सांगत या कामी निधीची उपलब्धता व निविदा प्रक्रिया राबवण्यास या बैठकीत प्रथम चर्चा करण्यात आली.
सफाळे रेल्वे स्थानकात सध्या अस्तित्वात असणाऱ्या पादचारी पुलाच्या पश्चिमेच्या बाजूला विस्तार करण्याचे काम जलद गतीने हाती घेण्यात येणार असून अस्तित्वात असलेल्या फलाट क्रमांक एक वर सरकता जिना उभारण्याचे काम जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी आश्वासित केले. याच पुलाच्या पूर्वेच्या बाजूला नागमोडी वळण व उतार असणाऱ्या पुलाला उद्वाहक (लिफ्ट) बसवण्याचे काम सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील राहील असेही या बैठकीत ग्रामस्थांना आश्वासित करण्यात आले.
अस्तित्वात असलेल्या पादचारी पुलाच्या दक्षिणेला उभारण्यात येणारा नवीन पादचारी पूल जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र नव्याने उभारण्यात येणारा उत्तरेकडील पादचारी पूल अस्तित्वात असलेल्या फाटकाच्या किमान २०० मीटर दूर असल्याने या पुलाचा नागरिकांसाठी उपयोग होणार नाही त्याकडे लक्षवेधून हा पूल पूर्वीच्या रेल्वे फाटकाजवळ उभारण्यात यावा अशी मागणी विकास कृती समितीने केली. या मागणीला खासदार डॉ. सवरा यांनी दुजोरा देत उत्तरेच्या भागात उभारण्यात येणारा पादचारी पूल हा शक्यतो जुन्या रेल्वे फाटकाजवळ उभारण्याच्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या अनुषंगाने रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने उद्या मोजमाप करण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. त्याच बरोबरीने पूर्वेकडील पुलासाठी सरकता जिना व उत्तरेच्या बाजूला भुयारी मार्ग उभारणीबाबत व्यवहार्यता अभ्यास करण्यावर रेल्वे ने संमती दर्शविली.
नागरिकांना अस्तित्वात असणाऱ्या जुन्या रेल्वे फटकाच्या ठिकाणाहून रेल्वे रूळ ओलांडण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. मात्र ही मागणी मान्य करणे रेल्वे व जिल्हा प्रशासनाला शक्य नसल्याचे सांगण्यात आले. सफाळे येथील नागरिकांना व रेल्वे प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध नसताना रेल्वे फाटक बंद केल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. उमरोळी व बोईसर प्रमाणे सफाळे येथील डीएफसी वाहिनीवर सिग्नल यंत्रणा उभी करून पादचाऱ्यांना पर्याय उपलब्ध होईपर्यंत रेल्वे ओलांडून जाण्याची मुभा देण्याबाबतची मागणी या बैठकीत अमान्य करण्यात आली. नागरिकांना पर्याय नसल्याने तसेच रेल्वेकडून देण्यात आलेली आश्वासन नागरिकांच्या मागण्यांची पूर्तता करत नसल्याने आमरण उपोषण आंदोलन सुरू ठेवत अधिक तीव्र करण्याचे निर्धार व्यक्त करण्यात आला. दरम्यान उद्या सफाळे रेल्वे स्थानकात पाहणी करण्यासाठी रेल्वे व जिल्हा प्रशासनाचे अधिकारी दौरा करणार असून त्यानंतर उपोषण मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले.