पालघर : पालघर शहरातील सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रसिद्ध झालेली अंतिम मतदार यादीत त्रुटी कायम असून पुरवणी यादी तयार करून त्यामध्ये अपात्र व अपूर्ण अर्ज केलेल्या नागरिकांची मतदारांची घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. विशेष म्हणजे नगरविकास विभागाचा कार्यभार सांभाळणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे पालघर नगरपरिषदेचाय अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे भाजपा तर्फे आरोप केले गेल्याने पालघर मध्ये भाजपा विरुद्ध शिवसेना अशी रंगत (कलगीतुरा) निवडणुकीपूर्वीच दिसून आली आहे.

पालघर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये काही त्रुटी राहिल्याचे दिसून आले. तसेच प्रारूप मतदार यादी मधील त्रुटीनबाबत आक्षेप नोंदवताना नमुना ‘अ’ व नमुना ‘ब’ अर्ज अपूर्ण असताना व त्यासोबत आवश्यक पुरावे जोडले गेले नसताना तसेच संबंधित नागरिकांचा संपर्क नंबर नसताना देखील नगरपरिषदेने या अर्जांच्या पडताळणी शिवाय हे अर्ज विचाराधीन घेण्यात आले. नगरपरिषदेने अर्ज स्वीकारण्यापूर्वी त्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी छाननी प्रक्रिया वगळून काही विशिष्ट गटांना व राजकीय पक्षांना सोयीस्कर व्हावे या दृष्टीने काम केल्याचे आरोप भाजपाच्या शहर पदाधिकाऱ्यातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला. ५५७२७ मतदार असणाऱ्या पालघर नगरपरिषद क्षेत्रापैकी साडेचार हजार पेक्षा अधिक आक्षेप नोंदवण्यात आल्याने मतदार यादी तयार करताना अधिकारी कर्मचारी वर्गाचा हलगर्जीपणा व काही विशिष्ट पक्षांना मदत व्हावी या दृष्टीने मतदार यादीचे काम झाल्याचे आरोप करण्यात आले.

प्रारूप मतदार यादीत आक्षेप नोंदवताना प्रत्येक मतदार नावाच्या बदला संदर्भात स्वतंत्र अर्ज भरून त्याचे स्व: साकक्षांकित पुरावे जोडणे अपेक्षित असताना काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यानी एक गठ्ठा व एकत्रितपणे हरकती नोंदविल्याबद्दल भाजपाने तक्रारीद्वारे निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून दिले. अशा एकत्रित निवेदनरुपी आक्षेप अर्जां सोबत आवश्यक पुरावे जोडले नसल्याने अशा अर्जांना ग्राह्य धरण्यासाठी दबाव आला तरीसुद्धा अशा अर्जांचा विचार केला जाऊ नये अशी मागणी भाजपाने केली आहे. एक गठ्ठा हरकतीन द्वारे मतदार यादीत दोन ते तीन हजार मतदार नव्याने समाविष्ट करण्यासाठी (मतदारांची घुसखोरी) शिवसेना (शिंदे) पक्षाचे पदाधिकारी प्रयत्नशील असून त्याकरिता नगरपरिषदेच्या अधिकारावर दबाव आणला जात असल्याचे देखील पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

१७ ऑक्टोबर पर्यंत हरकती नोंदवण्याच्या कार्यकाळापर्यंत दाखल केलेल्या पात्र अर्जांपैकी काही अर्जांवर निर्णय येण्याच्या प्रक्रियेत चूक झाली असल्यास त्यात दुरुस्ती करण्यास कोणतीही हरकत नाही अशी भूमीका पालघर भाजपा ने घेतली आहे. मात्र एक गठ्ठा व सामूहिकरीत्या विना पुरावे देण्यात आलेल्या अर्जांवर पालघर निवडणूक विभागाने निर्णय घेऊ नये अशी मागणी भाजपातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. पत्रकार परिषदेत भाजपाचे माजी शहर अध्यक्ष अशोक अंभुरे तसेच भाजपामध्ये नव्याने प्रवेश केलेल माजी नगरसेवक कैलास म्हात्रे व अक्षय संखे उपस्थित होते. त्यांनी या संदर्भात प्रसिद्ध शासन निर्णय व जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाला दिलेल्या तक्रार अर्जांबाबत माहिती दिली. यामुळे पालघर मध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच भाजपा विरुद्ध शिवसेना (शिंदे) असा सामना रंगला अजून नगर विकास विभागाच्या दबावाखाली सत्तास्थानी असणारा भाजपा नमणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

प्रभाग रचनेत त्रुटी

पालघर नगर परिषदेची प्रभाग रचना करताना नगर विकास विभागाच्या दबावाखाली तत्कालीन मुख्याधिकारी व अधिकारी यांनी सदोष प्रभाग रचना केल्याचे आरोप भाजपातर्फे करण्यात आले. प्रभाग रचनेबाबत उपस्थित झालेल्या आक्षेपाबाबत योग्य प्रकारे कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगून पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध करायची असल्यास विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक पुरावे यांची पडताळणी करून निर्णय घ्याव्यात यावा असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेतर्फे देखील अर्ज दाखल

प्रभागरचनेनुसार मतदार यादी तयार करताना पालघर नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी राहिल्या होत्या. याची उदाहरण देताना प्रभाग क्रमांक १० (होली स्पिरिट हायस्कुल, फिलिया होसिपीतलं, एचडीएफसी बँक, वृंदावन पार्क, अष्टविनायक गार्डन, साईनगर) मधील ३९१० मतदारांमध्ये वेऊर, गोठणपूर, डुंगीपाडा, लोकमान्य नगर, घोलवीरा व शहरातील इतर भागातील सुमारे १२०० ते १५०० मतदारांचा समावेश झाल्याचे शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक मकरंद पाटील यांनी पालघर नगरपरिषद तसेच जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. नगरपरिषदेतर्फे मतदार यादीच्या तयार करण्यात असलेले दोष सुधारण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

पालघर नगर परिषदेसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये साडेचार हजार पेक्षा अधिक नागरिकांनी आक्षेप नोंदवले होते. त्या अर्जांसोबत दाखल केलेल्या पुराव्यांची खातरजमा करणे तसेच नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांमार्फत स्थळ पाहणी केल्यानंतर मतदार यादीत आवश्यक बदल करण्यात आले आहेत. काही बाबी नजरचुकीने अथवा डेटा एन्ट्री दरम्यान चुकीच्या झाल्याचे निदर्शनास आले तर निवडणूक नियम व कायद्याच्या चौकटीत राहून पुरवणी यादी मध्ये आवश्यक बदल करण्यात येतील. – डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हाधिकारी