बोईसर : बोईसर परिसरातील मुख्य रस्ते कोंडीमुक्त करण्यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन यांनी संयुक्तपणे पुढाकार घेऊन आवश्यक उपाययोजना व कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बोईसरमधील मुख्य रस्त्यांवर दिवसभर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे वाहनचालक, कामगार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. रेल्वे स्थानक, नवापूर नाका आणि ओसवाल परिसरात अवैध फेरीवाले आणि हातगाड्या, पदपथावरील दुकानांचे अतिक्रमण, बेशिस्त रिक्षा वाहतूक आणि बेकायदा थांबे, गर्दीच्या वेळेस होणारी अवजड वाहनांची वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
वाढत्या वाहतूक कोंडीला शिस्त लावण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणारी वाहने आणि अवैध फेरीवाले यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने काही दिवसानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते.
रेल्वे स्थानक परिसर, मुख्य रस्ते आणि बाजारपेठ कोंडीमुक्त करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, उपसरपंच नीलम संखे, ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे आणि रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांनी मंगळवारी परिसराची संयुक्त पाहणी करून वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने, रिक्षा, फेरीवाले आणि दुकाने यांच्यावर संयुक्तरीत्या कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मात्र पुढील काळात बेशिस्त रिक्षाचालक आणि अवैध फेरीवाले यांना शिस्त लावून परिसर कोंडीमुक्त करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
ग्रामपंचायतीकडून उपाययोजना :
बाजारपेठ, पालघर आणि तारापूर रस्त्यावर अतिक्रमण केलेले दुकानदार आणि फेरीवाले याना नोटीस बजावण्यात आल्या असून अतिक्रमण हटवले नाही तर ग्रामपंचायतीचे विशेष पथक व पोलीस यांच्यामार्फत संयुक्तपणे नियमित कारवाई केली जाणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यवसाय करणारे फेरीवाले यांना आखून दिलेल्या सीमारेषेच्या आतमध्ये वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पोलिसांकडून उपाययोजना :
स्थानक परिसर आणि नवापूर नाका येथे मर्यादित संख्येने रिक्षांना थांबण्याचा नियम घालून देण्यात आला आहे. मर्यादेपेक्षा अधिक रिक्षा थांब्यावर आढळल्यास वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार आहे. नवापूर नाका येथील रिक्षा थांब्यावर एकावेळी फक्त आठ रिक्षा तर स्थानक रस्त्यावर फक्त दोन रिक्षांना उभे राहण्यास परवानगी देण्यात आली आहे तर नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर देखील प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
बोईसर ग्रामपंचायतीमार्फत रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करणारे फेरीवाले आणि दुकानदार यांच्यासाठी सीमारेषा आखून देण्यात आली असून त्यांनी त्याच जागेवर व्यवसाय करावा अन्यथा कारवाई केली जाणार आहे. तर नियमांचे उल्लंघन करणारी रिक्षा आणि इतर वाहनांविरोधात पोलीस विभाग नियमित कारवाई करणार आहे. कमलेश संखे ग्रामपंचायत अधिकारी, बोईसर