मूक मोर्चातून पोलिसांचा तीव्र निषेध
पालघर : वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली बोईसर येथील स्वदिच्छा मनीष साने ही २२ वर्षीय विद्यार्थिनी गेल्या महिनाभरापासून बेपत्ता आहे. पोलिसांकडे अनेक वेळा विनवण्या, विनंत्या केल्यानंतरही पोलीस प्रशासन तपासात सहकार्य करत नसल्याच्या विरोधात स्वदिच्छा हिचे नातेवाईक तसेच विविध समाजाने एकत्रित येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली स्वदिच्छा ही २९ नोव्हेंबर रोजी परीक्षा देण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती अजूनही सापडलेली नाही. त्यावेळी ती सापडली नसल्याने तिचे वडील मनीष साने यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. वांद्रे व बोईसर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी १३ डिसेंबर उजाडावे लागणे हा अन्याय असल्याचे मनीष साने यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींमार्फत सूचना दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी रात्रीच्या वेळेस बोलून घेऊन रात्री एक वाजता तक्रार दाखल करून घेतली व प्राथमिक तपासणी अहवाल (एफ आय आर) दाखल केला. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला असला तरी अजूनही ही तक्रार गुन्हे शाखेकडे आली नसल्याने तपास पुढे नेणे शक्य होत नाही, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याची धक्कादायक माहिती साने यांनी दिली. याचबरोबरीने मुलीच्या बेपत्ता होण्यावरून पोलिसांनी कोणती कार्यवाही केली याची माहिती वडील म्हणून साने यांनी मागवली होती. मात्र पोलिसांनी ती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा अकार्यक्षमपणा समोर येत असल्याचे आरोप येथे केले आहेत. माझी मुलगी बेपत्ता होऊन एक महिना झाल्यानंतरही पोलिसांचा तपास संथगतीने सुरू आहे, असे आरोप साने यांनी केले.
पोलीस या प्रकरणात जातीने लक्ष घालत नसल्यामुळे सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञातिवर्धक मंडळ, युवक मंडळ, कुणबी सेना व युवाशक्ती प्रतिष्ठान या सर्वानी एकत्रित येत मोठय़ा संख्येचा मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर यावेळी या मोर्चाद्वारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. याच बरोबरीने नीहे गावातील ३१ वर्षीय हितेश राजाराम पाटील ऑगस्टपासून उत्तर प्रदेश येथून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणीही पोलिसांनी तपास केला नसल्याचे आरोप केला गेला.