पालघर: तारापूर येथील अणु आस्थापनांच्या अनुषंगाने सुरू केलेल्या नागरी संरक्षण दलाचे कार्यक्षेत्र जिल्हाभर वाढविल्यानंतर मनुष्यबळाची समस्या पालघर जिल्ह्यातील या विभागाला भेडसावत आहे. २०१६- २०२१ दरम्यान हे कार्यालय बंद असल्याने स्वयंसेवकांची संख्या घटली असून सध्याच्या पार्श्वभूमीवर पालघरच्या नागरी संरक्षण दलाच्या कार्यालयाच्या सक्षमीकरणाची गरज भासत आहे.

तारापूर अणुऊर्जा केंद्र व भाभा अणु संशोधन केंद्राच्या उभारणीनंतर १९९१- ९२ च्या सुमारास तारापूर अणुऊर्जा कर्मचाऱ्यांच्या वसाहती मधील अतिथी गृहात नागरी संरक्षण दलाचे कार्यालय उभारण्यात आले. अणुऊर्जा प्रकल्पाच्या १६ किलोमीटर परिघातील नागरिकांना या दलाचे स्वयंसेवक देऊन आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांना विविध प्रशिक्षण दिले जात असे. त्याचबरोबरीने या परिघातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये बसवण्यात आलेले सायरनची दर महिन्यात एकदा चाचणी करण्यासाठी नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक व वॉर्डन कार्यरत असत.

या दलाचे कार्यक्षेत्र अणु आस्थापनाच्या १६ किलोमीटर परिघापर्यंत मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती जिल्हाभर वाढवण्यात आली होती. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर या दलातर्फे जिल्हा प्रशिक्षण शिबिर घेण्याचे आयोजित करण्यात आले. या दलाचे कार्यालय स्थापनेसाठी बोईसर भीमनगर येथे जागा देण्यात आली होती. मात्र उपलब्ध जागा प्रशिक्षण घेण्यासाठी परिपूर्ण नसल्याने कार्यालय उभारणीचा प्रश्न रेंगाळून राहिला होता. दरम्यान केंद्राच्या सूचनेमुळे २०१६ ते २०२१ दरम्यान नागरी संरक्षण दल बंद होते.

पालघर येथे जिल्हा मुख्यालय उभारल्यानंतर प्रशासकीय “अ” इमारतीमध्ये नागरी संरक्षण दलासाठी कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून पालघर कार्यालयातील १३ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदांपैकी फक्त कर्मचारी कार्यरत आहेत. उपलब्ध कर्मचाऱ्यांपैकी दोन वाहन चालक पुढील महिन्याचा निवृत्त होत असून या दलातर्फे प्रभावी कार्य करण्यासाठी मनुष्यबळाची व इतर आवश्यक बाबींची पूर्तता करून सक्षमीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नागरी संरक्षण दलाचे कार्य

सध्या पालघर येथील नागरी संरक्षण दलामध्ये १३७६ स्वयंसेवक कार्यरत असून स्वयंसेवकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय जुन्या स्वयंसेवकांना पुन्हा क्रियाशील होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या दलातर्फे पाच दिवसीय मूलभूत अभ्यासक्रम यासोबत आण्विक- जैविक- रासायनिक युद्धप्रसंगी घ्यावयाची दक्षता, बचाव कार्य, आपत्ती व्यवस्थापन, पूर प्रसंगी बचाव, आधुनिक संवाद तंत्र, प्रथमोपचार, अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण दिले जात असून पालघरच्या नागरी संरक्षण दलाच्या मर्यादित मनुष्यबळात दरवर्षी १०- १२ प्रशिक्षणात मधून १००० पेक्षा अधिक नागरिकांना वेगवेगळ्या बचाव कार्यासाठी प्रशिक्षित केले जात असल्याची माहिती देण्यात आली.