करोनाकाळात आशा सेविकांकडून नियमित पाहणी नाही, अनेक प्रकरणे बंद दाराआड
पालघर : देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच, जव्हार तालुक्यात एका १६ वर्षीय कुमारिका गर्भवतीचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यच्या ग्रामीण भागात कुमारिका तसेच १९ वर्षांखालील महिलांचे गरोदर राहण्याचे प्रमाण नेहमीच चिंतेची बाब असते. मात्र, गेल्या वर्षभरात करोनाकामांना जुंपलेल्या आशासेविकांना गावोगावी, घरोघरी जाऊन पाहणी करणे तसेच गर्भवती महिलांना औषधोपचार पुरवणे कठीण बनले आहे. त्यामुळे अनेकदा अशी प्रकरणे बंद दाराआड राहात आहेत.
जव्हार तालुक्यात राहणाऱ्या १६ वर्षीय कुमारिकेची १५ ऑगस्ट रोजी राहत्या घरीच प्रसूती झाली. विशेष म्हणजे, मुलगी गर्भवती असल्याची कल्पना तिच्या कुटुंबीयांनाही अनेक महिने नव्हती. प्रसूतीनंतर मुलीला आकडी येऊ लागल्याने तसेच रक्तदाब वाढल्याने तिला जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्या बाळाची प्रकृतीही चिंताजनक आहे. याप्रकरणी जव्हार पोलिसांनी ‘पोस्को’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून बाळाचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या दुर्दैवी घटनेनंतर पालघर जिल्ह्य़ातील गर्भवती विशेषत: कुमार वयात गर्भवती विशेषत: कुमार वयात गर्भवती राहणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात कुमारिकांच्या प्रसूतीचे प्रमाण नेहमीच लक्षणीय राहिले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत १९ वर्षांखालील महिलांच्या प्रसूतीचे प्रमाण २० टक्क्यांच्या आसपास पोहोचल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील हे प्रमाण चिंताजनक असल्याने आरोग्य विभागाच्या उपकेंद्रांमधील परिचारिका व आशासेविकांकडून गावोगावी, घरोघरी जाऊन पाहणी व सर्वेक्षण केले जाते. तसेच गर्भवतींना आवश्यक लोह, कॅल्शियम, फॉलिक आदी औषधे पुरवली जातात. मात्र, करोनाकाळात या कर्मचाऱ्यांकडे करोनाविषयक कामांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याने त्यांच्या मूळ जबाबदारीकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. अनेकदा ग्रामीण भागातील महिला प्रसूतीकरिता शहरी भागात आल्या असता त्यांचे गरोदर काळातील माहिती पत्रिका (कार्ड) अपूर्ण असल्याचे तसेच त्यांना औषधे न पुरवण्यात आल्याचे उघड होते.
अन्य सुविधांपासूनही वंचित
करोना पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्रांमधील कर्मचाऱ्यांना कारकुनी व करोनासंबंधित रुग्णांचा तपशील भरण्याची अतिरिक्त जबाबदारी असल्याने गरोदर महिलांचे बँक खाते व इतर तपशील भरण्यास टाळाटाळ केली जाते. शिवाय विवाहानंतर आधार कार्डावरील तपशिलात विसंगती असल्याचे दिसून येत आहे. परिणामी प्रसूतीनंतर शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून मातांना देण्यात येणाऱ्या शासकीय निधी मिळवण्यासाठी गरोदर माता आपल्या तान्ह्य़ा मुलांसह बँकेच्या बाहेर रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र जव्हार परिसरात अनेकदा दिसून येते.
समाजप्रबोधनाकडेही दुर्लक्ष
आशासेविकांकडून केवळ आरोग्यविषयक कामेच केली जात नाहीत, तर अल्पवयीन, किशोरवयीन मुलींचे व त्यांच्या पालकांचे सामाजिक, लैंगिक विषयांना अनुसरून प्रबोधनही केले जाते. मात्र, त्या जागृती मोहिमेलाही सध्या खीळ बसली आहे. विवाहापूर्वी गरोदर असल्याचे निदर्शनास आल्यास काही प्रकरणांमध्ये विवाह करण्यात येतो, तर काही प्रकरणांत परस्परांमध्ये दुरावा होऊन अविवाहित मातांची प्रसूती होण्याचे प्रकार होत आहेत. अल्पवयीन मुलीला संस्कार व लैंगिक शिक्षणाद्वारे माहिती दिली जात नसल्याने ही परिस्थिती गंभीर होत असल्याचे निरीक्षण आहे.
जव्हार उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या कुमारिका मातेला गंभीर अवस्थेमध्ये आणण्यात आले होते. तिचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र काही वेळेतच तिचे निधन झाले. कुमारिकांच्या प्रसूतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले असले तरी त्याची संख्या लक्षणीय आहे.
– डॉ. रामदास मारड, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय चव्हाण
बालविवाह टाळण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न होत असताना कुमारी मातांचे प्रमाण वाढत असल्याचे पालघर जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात दिसून येत आहे. कुमारी गर्भवती राहिल्यानंतर तरुणींना योग्य वेळेत वैद्यकीय मार्गदर्शन व सल्ला मिळाल्यास तिची प्रसूती टाळणे शक्य आहे. या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने बघणे आवश्यक आहे.
– विवेक पंडित, संस्थापक, श्रमजीवी संघटना
गरोदर मातांची तपासणी सुरू असून व त्यांना देण्यात येणाऱ्या औषधांचा साठा मुबलक प्रमाणात आहे. या संदर्भात ग्रामीण भागातील उपकेंद्रांमध्ये पुन्हा पाहणी करण्यात येईल. मृत कुमारिका मातेची संबंधित प्राथमिक अरोग्य केंद्रात नोंदणी करण्यात आली नव्हती.
– डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी