डहाणू : डहाणू शहरातील चंद्रसागरच्या खाजण जागेत भरतीच्या पाण्याला मज्जाव करण्याच्या कामास स्थानिकांनी विरोध केला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास एक तास रास्ता रोको करून हे काम बंद पाडण्यात आले. डहाणू समुद्राच्या भरतीचे पाणी डहाणू खाडी मार्गे आगवण, सरावली, लोणीपाडा येथील खाजण जागेमध्ये पसरते. मात्र या भागात खासगी कोळंबी व्यावसायिकांनी कोळंबी प्रकल्प उभारून खाजण क्षेत्रात पुराच्या पाण्याला प्रतिबंध निर्माण केला आहे. पुराचे पाणी पसरण्यासाठी चंद्रसागर येथे विस्तृत जागा आहे. मात्र ही जागा खासगी असल्याने त्यावर मातीचा भराव घालण्याचे काम काही दिवसांपासून सुरू होते. चंद्रसागर येथे उघडीच्या दरवाजाच्या मुखाजवळ मातीचा भराव करण्याचे हे काम सुरू होते. त्यामुळे खाजण जागेत पाणी पसरण्यास मज्जाव होईल आणि पावसाळय़ात पुराचे पाणी पसरण्यास अडथळा होऊन डहाणू गावात पुराचे पाणी शिरेल अशी भीती असल्यामुळे ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध करत एक तास रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांचा आक्रमक भूमिका पाहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने हे काम तात्काळ बंद केले. नैसर्गिकरीत्या पसरणाऱ्या समुद्राच्या भरतीच्या पाण्याला मज्जाव करून शहरात पूर परिस्थिती निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने अॅड. धनंजय मेहेर यांनी केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th May 2022 रोजी प्रकाशित
खाजण क्षेत्रात भरतीच्या पाण्याला मज्जाव ; डहाणू शहरातील चंद्रसागरमध्ये एक तास ‘रास्ता रोको’
ग्रामस्थांचा आक्रमक भूमिका पाहून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने हे काम तात्काळ बंद केले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 26-05-2022 at 01:54 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rasta rook by locals in dahanu city zws