पालघर: जव्हार नगर परिषदेकडे पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याचा फटका विकासकामांवर होताना दिसून येत आहे. सुमारे पावणेपाच कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या रस्त्यांच्या दर्जाबाबत तक्रारी पुढे आल्या आहेत. या तक्रारीवरून या रस्त्यांची पाहणी करून गेलेली त्रयस्थ लेखापरीक्षण संस्था काय अहवाल देते याच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जव्हार नगर परिषदेने दहा रस्त्यांची कामे यंदाच्या उन्हाळय़ात हाती घेतली होती. त्यापैकी चार कामे पूर्णपणे नवीन असताना अशा रस्त्यांच्या ठिकाणी योग्य पद्धतीने सपाटीकरण करून दोन थरांचे खडीकरण व डांबरीकरण करून नंतर हॉटमिक्स थर टाकणे अपेक्षित होते. सुमारे दोन कोटी ३० लाख रुपये किमतीच्या कामांच्या सपाटीकरण केल्यानंतर खडीकरण्याचा एकच थर टाकण्यात आला असून डांबरीकरण करताना बारीक आकाराची खडी वापरण्याऐवजी मोठय़ा आकाराची खडी वापरल्याने रस्त्याच्या मजबुतीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील सहा जुन्या रस्त्यांच्या दुरुस्ती व डांबरीकरणाच्या कामांमध्ये या रस्त्यावर पूर्वी असणाऱ्या खड्डय़ांना योग्य प्रकारे भरण्यात आले नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. तसेच दोन कोटी ४० लाख रुपये खर्च असणाऱ्या या रस्त्यांवर असणारे चढ-उतार समान पातळीवर करण्यात ठेकेदारांना अपयश आले आहे. ही कामे करताना नगर परिषदेचे अधिकारी- कर्मचारी यांचे पुरेशा प्रमाणात लक्ष नसल्याने रस्त्यांच्या कामांमध्ये अनेक ठिकाणी आवश्यक जाडीचा डांबरी थर अंथरण्यात आला नसल्याचे नागरिकांकडून आरोप होत आहेत.

यासंदर्भात पाहणी करण्यासाठी त्रयस्थ अभियांत्रिकी शिक्षण संस्थेची नेमणूक करण्यात आली असली तरीदेखील पाहणीसाठी आलेल्या अभियंत्यांनी प्रत्यक्षात गाडीतून खाली न उतरता फक्त झालेल्या कामाच्या ठिकाणी फेरफटका मारला असं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यांची योग्य प्रकारे कामे झाली नसताना त्रयस्थ पाहणी संस्थेकडून कशा प्रकारे अहवाल दिला जातो याबद्दलची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

नव्याने उभारण्यात आलेले रस्ते
• साईच्या मोटर्स ते भिसे घर
• देवकीनंदन सोसायटी अंतर्गत रस्ता
• हनुमान पॉइंट ते सूर्य तलाव
• भारती विद्यापीठ ते गोरवाडी जोडरस्ता

रास्ता मजबुतीकरण यादीतील काही रस्ते
• लासे घर ते पाचबत्ती रस्ता
• डॉ. कापडणी घर ते अर्बन बँक रस्ता
• पटांगशाह रुग्णालयसमोर रस्ता

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road works jawahar degraded inspection after complaint awaiting citizen audit report amy
First published on: 04-06-2022 at 00:29 IST