पालघर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे पालघरसह मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्याच्या समुद्र किनाऱ्याजवळील भागात ४ ते ८ ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्याचा (वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किमी) इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळील नागरिकांनी अत्यंत सावध राहणे आवश्यक आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ४ ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. ३ ते ५ ऑक्टोबर या काळात उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर आणि किनाऱ्यापासून दूर समुद्रात ताशी ४५-५५ किमी वेगाने व ६५ किमी प्रतितास वेगाने झोत असलेले सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची तीव्रता व मार्ग बदलल्यास वाऱ्याचा वेग आणखी वाढू शकतो. चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात उंच लाटा येऊन तो खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना या कालावधीत विशेषतः ५ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनीही किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
पालघरमध्ये पावसाचा अंदाज
पालघरमध्ये ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर वाऱ्याचा वेगही कमी (५ ते १० किमी/तास) राहील. मात्र, ८ ऑक्टोबर रोजी पावसाचा जोर वाढून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एक दिलासादायक बाब म्हणजे, ६ ऑक्टोबरच्या सकाळपासून हे चक्रीवादळ अरबी समुद्राच्या ईशान्येकडे सरकून हळूहळू कमकुवत होण्याचा अंदाज कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी वर्तवला आहे.
शेतीसाठी विशेष सल्ला
वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा लक्षात घेऊन शेतकरी बांधवांना कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. नवीन लावलेल्या आंबा, चिकू, काजू, नारळ, सुपारी आणि केळीच्या झाडांना तुटून कोलमडून पडू नये म्हणून काठीने आधार द्यावा. काढणीस तयार झालेल्या उन्हाळी भाताची कापणी पावसाचा अंदाज पाहून शक्यतो १० ऑक्टोबर नंतर करावी. काढणीस आलेला भाजीपाला, फळे व फुलांची तातडीने काढणी करून बाजारात पाठवावी.
प्रशासकीय सूचना
जिल्हा प्रशासनांना आपत्ती प्रतिसाद योजना सक्रिय करण्याचे, तसेच समुद्रकिनारी आणि सखल भागातील रहिवाशांसाठी स्थलांतर योजनांची तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी. चक्रीवादळ ‘शक्ती’चा मुख्य परिणाम गुजरात किनारपट्टीवर अपेक्षित असून, पालघर जिल्ह्यासाठी प्रामुख्याने मच्छीमारांसाठीचा आणि किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग वाढण्याचा इशारा आहे. त्यामुळे लोकांनी भीतीदायक माहिती पसरवण्याऐवजी केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.