पालघर : थकीत वेतन आणि हक्कांसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या कामगार महिलांच्या अंगावर वयोवृद्ध मालकिणीने चारचाकी गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार पालघर पूर्व येथील मोजे बनविणाऱ्या एका कारखान्यासमोर घडला आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कामगारांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
अनेक दिवसांपासून पूर्वेकडील वेवूर येथील मोजे बनविणाऱ्या कंपनीतील कामगार किमान वेतन आणि कामाच्या अटींबाबत व्यवस्थापनाकडे मागणी करत होते. व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी कंपनीच्या गेटसमोर शांततामय आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात महिलांचा देखील मोठा सहभाग होता. याच दरम्यान कंपनीची वयोवृद्ध मालकिण आपल्या गाडीतून गेटसमोर येत त्यांना आंदोलन महिलांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मागच्या बाजूस बसलेली वयोवृद्ध स्टेरिंग आपल्या हातात घेऊन महिलांवर गाडी चढविण्याचा प्रयत्न केला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, महिला कामगारांनी गाडीचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. पण मालकिणीने चालकाला खाली उतरवून स्वतः गाडी चालवत आंदोलकांच्या दिशेने नेली आणि काही कामगारांना चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी तीन ते चार महिला कामगार जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामगार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, “हा प्रकार म्हणजे मालकाच्या माजुरीपणाचा कळस आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संबंधित मालकिणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.