बोईसर: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सांडपाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकर्सवर ३१ मे पासून बंदी घातली आहे. औद्योगिक सांडपाण्याची वाहतूक करणाऱ्या टँकरद्वारे सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर बंदीचा नियम लागू केला आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून विविध प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत आहेत. तारापूर मधील उद्योगांमधून निघणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५० दशलक्ष लिटर क्षमतेचा सामुदायिक सांडपाणी प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यात आला आहे. टीईपीएस या खाजगी संस्थेमार्फत सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे संचालन होत असून सद्यस्थितीत २५ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते सांडपाणी वाहिनीद्वारे नवापूर जवळील खोल समुद्रात ७.१ किलोमीटर अंतर आजपर्यंत सोडण्यात येते. मात्र सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात टँकरद्वारे होणारी सांडपाण्याची वाहतूक आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करताना  अनियमितता होत असल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निदर्शनास आले होते. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने टीईपीएस या संस्थेला १६ मे रोजी अंतरिम सूचना करून ३१ मे पर्यंत जलप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कारभारात सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात टँकरबंदी सोबतच प्रत्येक कारखान्यामध्ये औद्योगिक सांडपाणी देखरेख आणि नियंत्रणासाठी स्काडा  प्रणालीचा अवलंब व त्याचा दैनंदिन अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सद्यस्थितीत परिसरातील राजकीय पक्षांशी संबंधित आणि वजनदार मंडळींच्या मालकीच्या १३ टँकर मधून सांडपाण्याची वाहतूक केली जाते.  टँकर बंदीमुळे यापुढे एमआयडीसीच्या वाहिनीमार्फतच औद्योगिक सांडपाणी हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात पोचवले जाणार आहे. त्यामुळे टँकरच्या माध्यमातून औद्योगिक सांडपाण्याची अवैध विल्हेवाट लावण्याला प्रकाराला चाप बसण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात टँकर बंदी सोबतच एमआयडीसीने औद्योगिक सांडपाणी वाहून देणाऱ्या नादुरुस्त वाहिन्यांची दुरुस्ती करणे. कारखान्यातून पाईपद्वारे चेंबरमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे, सीईटीपीने नेमणूक केलेल्या  ई आणि वाय या खाजगी बाह्य संस्थेऐवजी सीईटीपीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांनी चेंबर मधून सांडपाण्याचे नमुने गोळा करणे इत्यादी उपाययोजना अमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जलप्रदूषणास जबाबदार व  अटी शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या घटकांवर कठोर कायदेशीर कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. सर्व उद्योग, एमआयडीसी, सीईटीपी यांनी प्रदूषण नियंत्रण नियमांचे तंतोतंत पालन करावे.-राजू वसावे, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर – १