The place along national highway exhausted Notice to caution motorists ysh 95 | Loksatta

राष्ट्रीय महामार्गालगतची जागा खचली

पालघर-जव्हार-त्र्यंबकेश्वर- घोटी-सिन्नर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्गालगतची जागा खचली

पालघर-जव्हार-त्र्यंबकेश्वर- घोटी-सिन्नर रस्ता धोकादायक, वाहनचालकांना सावध करण्यासाठी सूचना फलकांऐवजी दगडांचा आधार

नीरज राऊत

पालघर : पालघर-जव्हार-त्र्यंबकेश्वर- घोटी-सिन्नर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावरील अनेक धोकादायक वळणांवर अजूनही कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था कार्यान्वित  नसल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी महामार्गलगतची जागा खचली आहे. चालकांना सावध करण्यासाठी रस्त्याच्या कडेला कोणताही सूचना फलक न लावता चक्क दगड ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे.

सध्या हा १६० अ क्रमांकाचा महामार्ग सात मीटर रुंद आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या मानकाप्रमाणे अनेक ठिकाणी दीड मीटरची साइडपट्टी अस्तित्वात नाही. विक्रमगड ते जव्हार, जव्हार ते मोखाडा तसेच मोखाडा ते त्र्यंबकेश्वर या भागात अनेक धोकादायक वळण व अपघात प्रवण क्षेत्र आहेत. अशा ठिकाणी वाहनचालकांना सावध करण्यासाठी सूचनाफलक तसेच धोकादायक ठिकाणी क्रॅश कार्ड, रिफ्लेक्टर, रंबलर इत्यादींचा अभाव आहे. 

विक्रमगड ते जव्हार या मार्गावरील काही ठिकाणचा भाग खचला आहे.  या भागात वाहन पडून मोठे अपघात  होण्याची शक्यता आहे. पावसाळा संपून सुमारे दीड महिन्याचा कालावधी उलटला तरीही अशा धोकादायक ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती  नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून ते चुकवण्याच्या नादात अपघात होत आहेत. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम दिलेल्या ठेकेदाराच्या दोष दायित्व कालावधीत हा रस्ता येत असल्याने ठेकेदाराची ती जबाबदारी आहे. खचलेल्या रस्त्याच्या भागाची तसेच इतर खड्डय़ांची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या या भागातील समस्यांकडे लक्ष देण्याची इच्छाशक्ती नसल्यास या रस्त्याला पुन्हा राज्यमार्ग म्हणून घोषित करावा,  अशी  मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अपघात प्रवण क्षेत्राकडे दुर्लक्ष

राष्ट्रीय महामार्ग तसेच तत्सम मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांची नोंद करून वाहतूक विभागाने ब्लॅक स्पॉट घोषित करावे, तसेच या ब्लॅक स्पॉट कमी करण्यासाठी संबंधित प्राधिकरणासोबत पाठपुरावा करून उपाययोजना आखण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे. असे असताना पालघर- त्र्यंबकेश्वर-घोटी-सिन्नर या महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले जात आहे.

सूचना फलक चोरीला

मोखाडा ते त्र्यंबकेश्वर या महामार्गावर अनेक धोकादायक वळणे असताना त्या ठिकाणी पूर्वी सूचनाफलक लावण्यात आले असल्याचे संबंधित ठेकेदाराने विभागाला सांगितले होते. मात्र या सूचनाफलकांची स्थानिकांकडून चोरी केली जात असल्याची सबब पुढे केली जात आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-11-2022 at 00:02 IST
Next Story
पालघर जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर