पालघर:आषाढी यात्रेदरम्यान पंढरपूर करिता सोडण्यात आलेल्या ९२ बस मधून ८०७६ भाविकांनी विठ्ठल दर्शनाचा लाभ घेतला आहे. यामधून पालघर राज्य परिवहन महामंडळास ५६ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गणेशोत्सवा दरम्यान देखील कोकणाकरिता विशेष बस सोडण्यात येत असल्याने भाविकांनी गणेशोत्सव काळात देखील एसटीला प्राधान्य देण्याचे आवाहन एसटी विभागाकडून करण्यात आले आहे.
पंढरपूर यात्रा सण २०२५ आषाढी एकादशी निमित्त पालघर राज्य परिवहन महामंडळाने पालघर जिल्ह्यातून एकूण ५५ बसेसचे नियोजन केले होते. याकरिता प्रत्येक आगारातून आगाऊ नोंदणी व समूह नोंदणी करण्यास देखील आवाहन केले होते. आगाऊ बुकिंग केलेल्या गाड्या २ जुलै पासून पंढरपूर करिता रवाना झाल्या होत्या.
एसटी प्रशासनाकडून ५५ बसचे नियोजन असताना प्रवाशी मागणी वाढल्याने प्रत्यक्षात ९२ बसेस द्वारे १८१ फेऱ्या करण्यात आल्या होत्या. यामधून ८०७६ भाविक प्रवाशांना विठ्ठलाचे दर्शन घडवून आणले. त्यात पालघर राज्य परिवहन महामंडळास ५६ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले. या प्रवाशांमध्ये ४३०४ महिला प्रवाशांनी तसेच ३२ अमृत जेष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.
कोकणासाठी देखील एसटी सज्ज
गणपतीच्या काळात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. पालघर जिल्ह्यातून गणपतीला गावी व कोकणात विशेष एसटी बसेस सोडल्या जातात. याकरिता गणेशोत्सवाच्या आधी आगाऊ नोंदणी करावी लागत असून आषाढी प्रमाणेच गणेशोत्सव काळात देखील भाविकांनी एसटीला प्राधान्य देऊन एसटीने सुखरूप प्रवास करण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता ५५ बसेसचे नियोजन करण्यात आले होते. यावर्षी पंढरपूरकरिता भाविकांची बसेसची मागणी वाढल्याने नियोजनापेक्षा ३७ बसेस जास्तीच्या सोडण्यात आल्यात. प्रवाश्यांना पंढरपूर येथे विठ्ठलाचे सुखरूप दर्शन घडवून पालघर जिल्ह्यातील विविध परिसरात भाविकांना राज्य परिवहन महामंडळाद्वारे सुखरूप सोडण्यात आले.- कैलास पाटील, विभाग नियंत्रक