पालघर: २७ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने, निसर्गाची देणगी लाभलेल्या पालघर जिल्ह्याचे पर्यटन केवळ आनंददायी प्रवासापुरते मर्यादित नसून ते स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचे इंजिन ठरले आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक गडकिल्ले आणि आदिवासी संस्कृती पर्यटकांना आकर्षित करत असतानाच, त्यांच्यामुळे अनेक पूरक व्यवसायांना रोजगाराच्या नव्या संधी आणि आर्थिक विकासाला चालना मिळत आहे. पर्यटन हे स्थानिक संस्कृती आणि जीवनशैलीशी जोडले गेल्याने शाश्वत विकासाचा एक आदर्श नमुना म्हणून पालघर जिल्हा पुढे येत आहे.

पालघर जिल्ह्याच्या समृद्ध पर्यटनामुळे स्थानिकांसाठी रोजगाराचे मोठे दालन उघडले आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, स्थानिक वाहतूक व्यवस्था तसेच इतर अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांना पर्यटकांच्या आगमनामुळे आर्थिक बळ मिळत आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील खाद्यसंस्कृतीचा लाभ घेत अनेक स्थानिक पदार्थ आणि कृषी उत्पादने पर्यटकांना आकर्षित करत आहेत. यात बोर्डीचे प्रसिद्ध चिकू, बहाडोलीची जांभुळे, आणि ताडगोळे यांसारख्या रानमेव्याचा समावेश आहे. याशिवाय, समुद्रकिनाऱ्यांवरील ताजी मासळी आणि स्थानिक बचत गट महिलांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, तसेच वारली चित्रकला आधारित उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सरस महोत्सव, बोर्डी चिकू फेस्टिवल, केळवा महोत्सव यामुळे बचत गटातील महिलांना लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले, हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे.

पालघरमधील पर्यटन केवळ स्थळांपुरते मर्यादित नसून, विविध महोत्सवांमुळे त्याला एक वेगळेच आकर्षण लाभले आहे. डहाणू, चिकू आणि कासा यांसारख्या महोत्सवांना मुंबई, ठाणे, नाशिक तसेच गुजरात राज्यातील पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. डहाणू महोत्सवातून कोट्यवधींची उलाढाल झाली, तर चिकू फेस्टिवलमुळे या प्रसिद्ध फळाला आणि त्यापासून बनविलेल्या पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळाली. हे महोत्सव स्थानिक कलाकारांना त्यांचे कौशल्य सादर करण्याची संधी देतात आणि पारंपारिक खाद्यसंस्कृतीचा परिचय करून देतात. यामुळे पर्यटकांना मनोरंजनासोबतच स्थानिक संस्कृती अनुभवता येते आणि स्थानिकांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळते.

जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी आणि पर्यटकांना एकाच दिवसात अनेक स्थळे पाहता यावी यासाठी हेरिटेज वॉक ही संकल्पना आवश्यक ठरली आहे. यामध्ये भवानगड, तांदुळवाडी, काळदुर्ग, केळवा-माहीम किल्ले यांसारख्या पुरातन वास्तूंना भेटी देता येतील. ही मोहीम जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाच्या सहकार्याने सुरू केल्यास स्थानिकांना गाईड म्हणून रोजगाराची संधी मिळेल आणि एसटीच्या उत्पन्नातही वाढ होईल. यामुळे ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व पर्यटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या जतनासाठीही मदत होईल.

पालघर जिल्ह्याचे पर्यटन केवळ नैसर्गिक सौंदर्यापुरते मर्यादित नाही, तर ते येथील लोकांच्या उपजीविकेचा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग बनले आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने, या जिल्ह्याचे पर्यटन स्थानिकांना आर्थिक बळ देत असून, ते एक आदर्श आणि शाश्वत विकासाचे प्रारूप म्हणून उदयास येत आहे.

व्यवसायिकांच्या प्रमुख मागण्या आणि भविष्यवेध

पर्यटन क्षेत्राच्या या प्रगतीमध्ये अजूनही काही आव्हाने आहेत. स्थानिक व्यवसायिकांनी पर्यटन विकासासाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये अनावश्यक परवानग्या रद्द करणे, सर्व परवानग्या ‘एक खिडकी योजने’ द्वारे उपलब्ध करून देणे, पर्यटन वास्तूंचे नियमितीकरण करणे आणि केळवे बीचसारख्या स्थळांचा एमटीडीसीच्या नकाशावर समावेश करण्याची मागणी प्रामुख्याने आहे. या मागण्या पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील पर्यटन अधिक सुलभ आणि व्यावसायिक होईल.

जिल्ह्यात काय पाहू शकणार…

पावसाळ्यात जव्हार येथे धुक्यांनी आसपासची गावे आणि टेकड्या झाकून जातात. जव्हार हे वारली पेंटीगसह शिरपामाळ, जव्हार राजवाडा, हनुमान पॉईंट व दाभोसा धबधबा साठी सुद्धा प्रसिध्द आहे. यासह केळवा, माहीम, शिरगाव, सातपाटी, मुरबे, आलेवाडी, नांदगाव हे समुद्रकिनारे, भवानगड, तांदूळवाडी, काळदुर्ग, केळवा, माहीम, वसई किल्ले, काळमांडवी, दाभोसा, हिरडवाडा धबधबा, डहाणू येथील महालक्ष्मी, विरार येथील जीवदानी, केळवे येथील शितलादेवी, सेंट पीटर चर्च ही धार्मिक स्थळे यासह मासेमारी बंदरे व सर्वात मोठ्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्प इथे देखील पर्यटक भेट देऊ शकतात