पालघर : जिल्हा मुख्यालय असणाऱ्या पालघर शहराच्या प्रवेशावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या चौकाभोवती रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च येणार असून रुंदीकरणाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येत आहे.
पालघर येथील नवली रेल्वे फाटक एप्रिल महिन्यात बंद करण्यात आले असून पालघरच्या पूर्व पश्चिम भागात प्रवास करण्यासाठी एकमेव असणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाचा वापर करण्यात येतो. समर्पित रेल्वे मालवाहू मार्गाच्या उभारणीत या उड्डाणपुलाची उंची वाढवण्याच्या दृष्टीने नवीन पूल उभारण्यात आला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून रेल्वे उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याची दिशा बदलल्याने नव्याने समस्या निर्माण झाली होती.
पालघर शहरात येणारी अवजड वाहन, जिल्हा मुख्यालयाकडे येणारा मार्ग तसेच पालघर बोईसर मार्गावर असणारी आनंदाश्रम शाळा, जीवन विकास संस्थेची शाळा, पालघरचे सोनोपंत दांडेकर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, चाफेकर महाविद्यालय तसेच पालघर तालुका औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी तसेच नागरिकांसाठी हा चौक महत्त्वपूर्ण ठरत असून या ठिकाणी दिवसात अनेकदा वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना १५ मिनिटांपासून ४५ मिनिटांपर्यंत थांबून राहावे लागत आहे.
अस्तित्वात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या लगत काही ठिकाणी अतिक्रमण झाले असून उर्वरित ठिकाणी झाड व गटार व्यवस्था असून या चौकाचे रुंदीकरण करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्या समवेत १८ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता.
या चौकात येणाऱ्या सर्व वाहनांना डावीकडे सहजपणे प्रवेश घेता यावा (फ्री लेफ्ट) या दृष्टीने चौकाच्या प्रत्येक बाजूला जागेच्या उपलब्धतेनुसार सुमारे पाच मीटर रुंदीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. या रुंदीकरणाच्या लगतच्या भागात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संरक्षण बिंदूची उभारणी करणे व रुंदीकरणासाठी ७५ ते १५० मिलिमीटर खडीचे थर व जीएसबी खडीकरण करणे व पुढे एपीएम व बीएम करण्याचे प्रस्तावित आहेत. या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या साईडपट्टीचे मुरुम भरणी करणे देखील अपेक्षित असून या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या अधिपत्याखाली असणाऱ्या विकास निधीतून तरतूद करण्याचे अपेक्षित आहे.
या रुंदीकरणासाठी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरीने निधीच्या उपलब्धतेसाठी व इतर मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आली आहे अशी माहिती पुढे आली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुढील काही महिन्यात सुरू होणे अपेक्षित असून यामुळे पालघर शहरात व विशेषता जिल्हा मुख्यालयात येणाऱ्या नागरिकांना होणारी गैरसोय कमी होण्याची शक्यता आहे.
रुंदीकरणाचे उद्दिष्ट
पालघर तालुक्यातील झाई-बोर्डी-रेवस-रेड्डी या प्रमुख राज्य मार्ग ४ चा भाग छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जात असून येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिल्हा मुख्यालय, मनोर, पालघर शहर, बोईसर तसेच पालघर, माहीम, केळवे, सफाळा या दिशेला जोडणारा प्रमुख चौक असून या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे.
झाई-बोर्डी-रेवस-रेड्डी या मार्गाला रस्ते विकास योजना सन २००१-२०२१ अनुसार प्रमुख राज्य मार्ग दर्जा प्राप्त असून पालघर तालुक्यात हा रस्ता बोईसर, पालघर, केळवे, सफाळे तसेच केळवे व शिरगाव पर्यटन स्थळ, बोईसर व पालघर औद्योगिक वसाहत यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे या रस्त्याची पालघर तालुक्यातील लांबी ९२.१५ किलोमीटर इतके आहे.