पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून बांधणी; उत्तरदायित्व संपण्याआधीच दुरवस्था

डहाणू : तालुक्यातील खंबाळे- वणई- दाभोण या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्याची दुर्दशा झालेली असून वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे उत्तरदायित्व संपण्याच्या आधीच रस्ता खड्डेमय झाल्याने हा रस्ता पूर्ववत करण्याची मागणी अ‍ॅड. विराज गडग यांनी कार्यकारी अभियंता पालघर यांच्याकडे केली आहे.

वाणगावनजीकच्या खंबाळे, वणई, दाभोण हा रस्ता चार वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून पूर्ण करण्यात आला. मात्र दुसऱ्याच वर्षी हा रस्ता वाहतुकीसाठी नादुरुस्त झाला आहे.

मात्र या वर्षी या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे. वाहन खड्डय़ात आदळून अपघाताचे प्रकार घडत आहेत. याबाबत प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. आजारी रुग्ण तसेच वयोवृद्धांना या रस्त्यावरून पायी जाणे सोयीचे वाटत आहे. वाहनांच्या आदळआपटीमुळे रुग्णांना तसेच गरोदर महिलांना यावरून प्रवास त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

कासा गावातील रस्त्यांची खड्डय़ांमुळे दुर्दशा

कासा: कासा गावातील प्रमुख रस्त्यांची खड्डय़ामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. काही वर्षांपूर्वीच तयार केलेले रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर पडलेल्या खड्डय़ांमुळे या रस्त्यावरून पायी चालणेसुद्धा अवघड झाले आहे.पायी चालतानाही नागरिकांना खड्डय़ातूनच रस्ता शोधावा लागत आहे. दुचाकीचालकांनाही या खड्डय़ामधून रस्ता शोधावा लागत आहे.

कासा खुर्द हे डहाणू तालुक्यातील एक मुख्य बाजारपेठेचे गाव आहे. वेगवेगळी खरेदी करण्यासाठी, बँकेत, पोस्टात दररोज हजारो नागरिक कासा गावात येत असतात. या सर्वाना या खड्डय़ांचा त्रास सहन करावा लागत आहे. कासा गावात शिवमंदिरापासून डोंगरीपाडा, बँक ऑफ महाराष्ट्र ते विठ्ठलनगर, कासा ते चारोटी अशा सर्वच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.

कासा गावातील रस्त्यांच्या बाजूने जलजीवन पाणीपुरवठा कामासाठी उन्हाळ्यामध्ये खोदकाम केले होते. परंतु त्या खोदकामामुळे रस्त्यावर आलेली माती तशीच राहिल्यामुळे रस्त्याच्या मधोमध चालावे तर खड्डे आणि बाजूने चालावे तर चिखल अशी परिस्थिती झाली आहे. तरी प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून हे खड्डे बुजवून नागरिकांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी केली जात आहे.