वाडा : वाडा नगरपंचायतमध्ये थेट नगराध्यक्ष व १७ नगरसेवक पदांसाठी निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीत शिवसेना, भाजपा तसेच शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी झाल्यास थेट लढत होण्याची शक्यता आहे. महायुती सोबतच मनसेची महाविकास आघाडीबाबत बोलणी सुरू आहे. प्रत्येक पक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर अथवा बंडखोरी होण्याची शक्यता आहे.
सन २०१७ वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी व १७ नगरसेवक प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली होती.नगरपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता होती. नगराध्यक्षपद हे अनु.जमाती (महिला) करीता राखीव असल्याने त्यावेळेसच्या शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या गीतांजली कोलेकर (३११९ मते) ह्या नगराध्यक्षपदी निवडून आल्या होत्या. त्यांनी भाजपचे उमेदवार व दिवंगत आदिवासी विकास मंत्री कै.विष्णू सवरा यांची कन्या तथा पालघर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ.हेमंत सवरा यांची बहीण निशा विष्णु सवरा (२६७७ मते) यांचा तब्बल ४४२ मतांनी पराभव केला होता.
२०१७ मध्ये एकूण १७ नगरसेवक प्रभागासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत- शिवसेनेने- ०६, भाजपने- ०६, काँग्रेसने- ०२, बहुजन विकास आघाडीने -०२ तर राष्ट्रवादी काँग्रेसने -०१ जागांवर विजय मिळवला. मनसेला एकही जागा मिळाली नव्हती. यांचा कार्यकाळ २०१८ ते २०२३ असा राहिला. २०२२ मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षफुट झाली. त्यावेळी नगराध्यक्ष गीतांजली कोलेकर ह्या शिवसेना (उबाठा) तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात राहिले. पक्षफुटीनंतर शिवसेनेतील (संदीप गणोरे, जागृती काळण) या दोन नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षांतर करता (वगळता) बाकी चार (०४) नगरसेवक (उबाठा) पक्षामध्येच राहणे पसंत केले.
यावर्षी २०२५ मध्ये होणाऱ्या वाडा नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण (महिला) उमेदवारासाठी असुन अनेकजण इच्छुक असल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक रंगत होण्याची शक्यता अधिक आहे. २०२३ मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यापासून या वाडा नगरपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या मुख्याधिकारी मनोज पष्टे कारभार पाहत आहेत.२०१७ मध्ये मतदार संख्या १०,९१८ होती. २०२५ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत १,९७५ नवीन मतदारांची नोंदणी झाल्याने १२,८९३ झाली आहे. यात संभाव्य दुबार मतदार संख्या ३९५ च्या आसपास आहे.
२०१७ मध्ये व २०२५ निवडणुकीत प्रभाग रचना एक वगळता बाकी समान आहेत. मात्र अनेक प्रभागात आरक्षण बदल झाला असल्याने २०१७ मध्ये निवडणूक लढलेल्या माजी नगरसेवकांना याचा फटका बसू शकतो. तरी देखील माजी नगरसेवक अन्य प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे.
सद्यस्थितीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) युती तर महाविकास आघाडी करण्याबाबत व सोबत मनसेला घेण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरीही एकंदरीत पक्षांची तयारी पाहता सर्व पक्ष आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे. याबाबत अर्ज भरण्याच्या पासून ते अर्ज मागे घेण्याच्या अंतीम दिवशी पर्यंत याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरांची बहीण निशा विष्णु सवरा यांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यांना नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अथवा होवु घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरवून जिल्हा परिषद अध्यक्षासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र वाडा नगरपंचायत निवडणुकीत ही शक्यता धूसर असल्याचे सांगितले जात आहे.
नगराध्यपदासाठी व प्रभागांमध्ये उमेदवार नक्की कोण असतील याबाबत अद्याप पर्यंत कुठल्याही राजकिय पक्षाकडून अधिकृत माहिती दिली गेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनाच्या (उबाठा) माजी वाडा उपनगराध्यक्ष वर्षा गोळे, भाजपकडून निशा सवरा व माजी नगरसेविका रिमा गंधे, शिवसेना (शिंदे गट) माजी नगरसेवक संदीप गणोरे यांची पत्नी यांची नावे सध्या चर्चेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष हे १० प्रभागात निवडणूक लढविणार असल्याचे वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार यांनी सांगितले. तर महाविकास आघाडी करण्याबाबत बोलणी सुरू असुन ती न झाल्यास सर्वच १७ प्रभागांमध्ये निवडणूक लढवू असे शिवसेना (उबाठा) पक्षाचे वाडा तालुका अध्यक्ष निलेश सीताराम पाटील यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ०५, ०७ व १० या तीन जागांसाठी मनसे आग्रही असुन या जागांवर एकमत झाल्यास महाविकास आघाडीसोबत जावू असे मनसे तालुकाध्यक्ष कांतीकुमार ठाकरे यांनी सांगितले.
प्रभाग १६ मधून भाजपकडून प्रथमेश गोरे, शिवसेना (शिंदे गट) कडून अजिंक्य अशोक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) विराज बाळकृष्ण पाटील व युवराज ठाकरे यांच्यासह अन्यजण इच्छुक असल्याने स्वतंत्र लढत झाल्यास येथे चौरंगी लढतीची शक्यता आहे. प्रभाग १५ मधून काँग्रेसच्या माजी नगरसेविका विशाखा तुकाराम पाटील, प्रभाग १७ मधून माजी नगरसेविका सुचित्रा बाळकृष्ण पाटील ह्या पुन्हा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.
तर महाविकास आघाडीच्या सोबतीला मनसे, बहुजन विकास आघाडी पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी निवडणुकीत तिरंगी अथवा बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.निवडणुकीसाठी येत्या सोमवारपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सहा दिवसांचा अवधी देण्यात आला असला तरी पक्षाकडून “अ व ब” फॉर्म प्राप्त झाल्यानंतर उमेदवारी बाबतचे चित्र स्पष्ट होईल अशी सद्यस्थिती आहे.
२०१७ वाडा नगरपंचायत निवडणूक
| मतदार वर्ग | मतदार संख्या |
| पुरुष | ५६३५ |
| स्त्री | ५२८३ |
| एकूण मतदार संख्या | १०,९१८ |
२०२५ वाडा नगरपंचायत निवडणूक प्रारूप व अंतीम यादी समान आहे
| मतदार वर्ग | मतदार संख्या |
| पुरुष | ६,३७६ |
| स्त्री | ६,५१७ |
| एकूण मतदार संख्या | १२,८९३ |
यामध्ये दुबार संभाव्य मतदार यांची संख्या – ३९५ आहे.
(एकाच व्यक्तीचे नाव किंवा एकाच नावाचे दोन व्यक्ती असण्याची शक्यता आहे.)
मतदार संख्येत वाढ = १,९७५
दुबार संभाव्य मतदार संख्या वगळता = १,५८०
