
बंगलादेशमधील प्रसिद्ध अभिनेत्री राइमा इस्लाम शिमू यांची हत्या करण्यात आलीय.
धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये त्यांच्या पतीलाच पोलिसांनी अटक केली असून lत्याने गुन्ह्याची कबुली दिलीय.
एका मित्राच्या मदतीने पत्नीची हत्या करुन मृतदेह लपवल्याचं राइमा यांच्या पतीने म्हटलंय. मात्र या प्रकरणामध्ये पतीला अटक करण्याचा निर्णय केवळ एका दोऱ्याच्या बंडलमुळे घेतल्याची माहिती समोर येतेय.
घरगुती वादामधून राइमा यांची हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना २४ तासांच्या आत अटक केली.
बांगलादेशमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार १६ जानेवारी रोजी राइमा यांची हत्या करण्यात आलेली.
त्यानंतर राइमा यांचा मृतदेह लपवण्यासाठी त्यांच्या नवऱ्याने एका मित्राची मदत घेतल्याचं ढाका पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झालंय.
राइमा यांचा मृतदेह गोणीमध्ये बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस तपासासाठी घरी पोहचले.
पोलिसांनी घरी जाऊन तपास सुरु केला असता त्यांना राइमाचे पती शेखावत अली यांच्या गाडीमध्ये एक प्लास्टिकच्या दोरीचा बंडल मिळाला.
गाडीमध्ये जो दोरीचा बंडल मिळाला त्याच पद्धतीच्या दोरीचा वापर दोन गोण्यांमध्ये मृतदेह टाकून त्या शिवण्यासाठी केल्याचं उघड झालं आणि पतीच आरोपी असल्याचा शंका पोलिसांना आली.
हत्या केल्याचे पुरावे लपवण्यासाठी राइमाच्या पतीने गाडी पाण्याने धुतली होती. तसेच दुर्गंध येऊ नये म्हणून ब्लीचिंग पावडर वापरण्यात आली होती.
पोलिसांनी एका दोऱ्याच्या बंडलच्या आधारे पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.
तसेच यात एका मित्राने मदत केल्याचा खुलासा शेखावतने केल्यानंतर अन्य एका व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)