-संतोष प्रधान

शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे पिता-पुत्र किंवा वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या काका-पुतण्याच्या जोडीने राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. आता विधान परिषद आणि विधानसभेचे पीठासीन अधिकारीपद हे सासरे आणि जावयाकडे जाणार आहे. पिता-पुत्र, काका-पुतणे यानंतर सासरे आणि जावयाची जोडी राज्याच्या सत्ताकेंद्रात बघायला मिळणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदी भाजपाने ॲड. राहुल नार्वेकर यांना संधी दिली. विधान भवन असलेल्या कुलाबा मतदारसंघाचे नार्वेकर हे आमदार. राज्याच्या राजकारणात भाजपाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करताना धक्कातंत्राचा अवलंब केला होता. विधानसभा अध्यक्षपदावरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अनपेक्षित अशी निवड केली. भाजपामध्ये बाहेरून आलेल्यांची चलती असते, अशी ओरड केली जाते. यामुळे जुनेजाणते नेते वा कार्यकर्ते मागेच राहतात. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात आलेल्या नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी संधी देऊन भाजपाने आणखी एका बाहेरून आलेल्या नेत्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बाहेरच्या पक्षातून आलेले. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतही बाहेरून आलेल्यांना प्राधान्य मिळाले.

राज्यसभेसाठी भाजपाने डॉ. अनिल बोंडे व धनंजय महाडिक या अन्य पक्षातून आलेल्यांना संधी दिली. विधान परिषदेची उमेदवारी देताना दरेकर आणि प्रसाद लाड या अन्य पक्षातून आलेल्यांचा विचार झाला. नार्वेकर, दरेकर, लाड, बोंडे किंवा महाडिक या अन्य पक्षातून आलेल्यांना संधी मिळणार असल्यास आम्ही काय करायचे, असा सवाल भाजपामधील जुनीजाणती नेतेमंडळी करू लागली आहेत.

कोण आहेत राहुल नार्वेकर? –

पेशाने वकील असलेले राहुल नार्वेकर हे मूळचे शिवसेनेतील. शिवसेनेत कायदेशीर बाजू ते सांभाळत असत. राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत त्यांनी अर्ज भरले पण त्यांना माघार घ्यावी लागली होती. शिवसेनेने आमदारकी दिली नाही ही सल त्यांना होती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. २०१४ मध्ये राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून आमदारकी दिली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर आणि नार्वेकर या सासरे-जावयाच्या जोडीची चलबिचल सुरू झाली. दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगू लागली होती. तेव्हा नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे जुनेजाणते भाजपा नेते राज पुरोहित यांना डावलून पक्षाने नार्वेकर यांना उमेदवारी दिली आणि ते भाजपाच्या बालेकिल्ल्यात निवडून आले. शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप असा प्रवास करणाऱ्या नार्वेकर यांना शिवसेनेत काही पदे मिळाली नाहीत. पण राष्ट्रवादीने आमदारकी तर भाजपाने थेट विधानसभा अध्यक्षपद दिले आहे.

सासरे-जावई एकाच वेळी पीठासीन अधिकारी –

राज्याच्या इतिहासात विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभा अध्यक्ष या दोन महत्त्वाच्या घटनात्मक पदांवर सासरे आणि जावयाची जोडी विराजमान होईल. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ७ जुलैला संपत आहे. म्हणजे ३ ते ७ जुलैपर्यंत उभय सभागृहांचे पीठासीन अधिकारी हे सासरे व जावई असतील. पुढील काळात निंबाळकर पुन्हा सभापती झाल्यास ही जोडी कायम राहिल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशभरातील जोड्या –

पंडित नेहरू-इंदिरा गांधी -राजीव गांधी या तीन पिढ्या पंतप्रधान, एच.डी. देवेगौडा- कुमारस्वामी, शंकरराव चव्हाण-अशोक चव्हाण, करुणानिधी-स्टॅलिन, देवीलाल- ओ.पी. चौटाला, शिबू सोरेन-हेमंत सोरेन, एस. आर. बोम्मई-बसवराज बोम्मई, बिजू पटनायक-नवीन पटनायक, पूर्णॊ संगमा आणि कोनार्ड संगमा या पिता-पुत्रांनी, लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी पती-पत्नी, एन. टी. रामाराव आणि चंद्रबाबू नायडू हे सासरे-जावई, वसंतराव नाईक-सुधाकरराव नाईक काका-पुतणे अशा विविध जोड्यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले. आता नाईक निंबाळकर आणि राहुल नार्वेकर या सासरे व जावई जोडीची पीठासीन अधिकारी म्हणून भर पडली.