छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र तथा माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांनी एक लग्न झालेले असताना ते लपवून ठेवत धमकावून, भावनिक आमिष दाखवून लग्न केले. परंतु हे लग्न सामाजिक दृष्ट्या अमान्य करून व शारीरिक संबंधानंतर गर्भपात केला. सिद्धांतने ५० लाखांच्या हुंड्यापोटी छळ केला. माझे वडील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने धमकावल्याचा आरोप मुंबईतील एका ३० वर्षीय महिलेने कायदेशीर नोटीस पाठवून केला आहे.
सिद्धांतचे वडील मंत्री असल्याने या प्रकरणात कारवाई होत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या नोटिसीचे उत्तर आठवडाभरात न मिळाल्यास संबंधित तक्रार महिला आयोगाकडे पाठवून व पोलिसांकडेही तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यात म्हटले आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने दोन दिवसापासून सिद्धांत शिरसाट व त्यांचे वडील तथा मंत्री, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी संपर्क केला. मात्र दोघांकडूनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु सदर नोटीस आपल्या मार्फतच पाठवण्यात आली आहे, अशी माहिती संबंधित महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी “लोकसत्ता”शी बोलताना दिली.
या नोटीसीमध्ये संबंधित तीस वर्षीय महिला म्हणते की, आपले व सिद्धांत यांचा २०१८ मध्ये मोबाईल व्हाट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आदी समाज माध्यमावरून संपर्क झाला. चेंबूर येथील सिंधी सोसायटीतील फ्लॅटवर आमच्या भेटीगाठी झाल्या. शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. आपल्यासोबत लग्न करण्यासाठी सिद्धांत यांनी भावनिक ब्लॅकमेल केले. हातावर ब्लेडने जखमा केल्या. डोक्याला पिस्तूल लावून आत्महत्या करतो, असं धमकावत पिस्तूल लावलेला फोटोही त्यांनी फेसबुकवर अपलोड केला. त्यामुळे माझे आई-वडील बहिण व अन्य कुटुंबीयासमोर आम्ही १४ जानेवारी २०२२ मध्ये बौद्ध रीतीरीवाजाप्रमाणे विवाहबद्ध झालो.
यासंदर्भातील अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. आपली आई व सिद्धांत यांची बहीण यांची हर्षदा व शिल्पा यांच्यातही संभाषण झाले. गर्भपाताशी संबंधित वैद्यकीय पुरावे आहेत. सिद्धांत यांनी सुनीता यांच्याशी लग्न झाल्याचे लपवून ठेवले. तसेच नाशिक येथील एका महिलेशीही ते बोलत असतात, आदी आरोप नोटिशीत केलेले आहेत. या अनुषंगाने सिद्धांत याची बाजू जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क केला तसेच त्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवूनही म्हणणे मांडण्याविषयी विनंती केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.