आप सरकारच्या दक्षता विभागाने शुक्रवारी भ्रष्टाचार प्रकरणात जालंधरमधील आमदार रमन अरोरा यांना अटक केल्याने ते अडचणीत सापडले आहेत. अरोरा जालंधर मध्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. दक्षता विभागाने त्यांच्या जालंधर येथील घरावर छापा टाकला आणि झडतीनंतर त्यांना अटक करण्यात आली. काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून सामान्य लोकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कोण आहेत रमन अरोरा? त्यांच्यावरील आरोप काय? त्याविषयी जाणून घेऊ…

कोण आहेत रमन अरोरा?

जालंधरच्या पीर बोडला बाजार येथील रहिवासी रमन अरोरा एक कापड व्यापारी आहेत. त्यांना कोणताही राजकीय अनुभव नव्हता. कोविड-१९ साथीच्या काळात त्यांनी केलेल्या सेवेमुळे ते प्रसिद्ध झाले होते. त्यामुळेच मागील काँग्रेस सरकारच्या काळात खत्री अरोरा पंजाब बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते माता का जागरण आणि कीर्तन सादर करणारे भजन गायक म्हणूनदेखील प्रसिद्ध आहेत.

असे म्हटले जाते की, डिसेंबर २०२१ मध्ये जालंधरमधील देवी तालब मंदिराच्या भेटीदरम्यान रमन अरोरा यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे लक्ष वेधून घेतले होते. पुढच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने त्यांना जालंधर सेंट्रलमधून उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजिंदर बेरी यांचा २४७ मतांनी पराभव केला. आमदार म्हणून अरोरा त्यांच्या मतदारांना जवळजवळ दररोज भेटायचे आणि सांडपाणी व्यवस्थेतील समस्यांसारख्या नागरी समस्यांवर चर्चा करायचे. परंतु, काही दिवसांनी लोक त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले. आमदारांच्या इशाऱ्यावर केल्या गेलेल्या प्रत्येक कामासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी पैसे आकारल्याचे आरोप होते.

अरोरा यांच्यावर आरोप काय?

दक्षता विभागाने १५ मे रोजी एका सहायक नगररचनाकाराला ३०,००० रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. सूत्रांनी सांगितले की, चौकशीदरम्यान अरोरा यांचे नाव समोर आले आणि त्यामुळे शुक्रवारी त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. आपच्या काही अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री भगवंत मान यांना अरोरा यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर एका आठवड्यापूर्वी सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली होती. मुख्य म्हणजे काही भाजपा नेत्यांशी अरोरा यांची वाढती जवळीकदेखील पक्षात चिंतेचे कारण ठरत होती.

अरोरा यांच्याकडून केली जाणारी विधाने आणि ते सतत वादात अडकत असल्याचेही आप नेतृत्वाला पटत नव्हते. २०२२ मध्ये पंजाबमध्ये पक्ष सत्तेत आल्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी दावा केला की, त्यांना भाजपकडून २५ कोटी रुपयांसाठी पक्ष बदलण्याच्या ऑफर मिळाल्या होत्या. त्याच वर्षी जालंधरचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) नरेश डोगरा यांच्याशी त्यांचा वाद झाला. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अरोरा आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसले आणि त्यांच्यावर पोलीस उपायुक्तांना मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अरोरा यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडियावर या प्रकरणाविषयी एक पोस्ट लिहिली आणि म्हटले की भ्रष्टाचाऱ्यांना सोडले जाणार नाही; मग ते त्यांच्या पक्षातील असोत किंवा नसोत. मान म्हणाले, “ही एखाद्या व्यक्तीविरुद्धची लढाई नाही, तर भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धची लढाई आहे. आम्ही ही व्यवस्था स्वच्छ करू. कारण- आमचे भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य-सहिष्णुता धोरण आहे. मी सर्व व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना खात्री देतो की, घाबरू नका. जर कोणी त्यांना धमकावत असेल किंवा पैसे उकळत असेल, तर त्यांनी आमच्याकडे तक्रार दाखल करावी. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, कोणालाही सोडले जाणार नाही.”