केंद्रातील मोदी सरकारने कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंह, कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केलाय. पंतप्रधान मोदींनी मंडल, मंदिर, बाजार अन् मंडई या चार ‘म’अक्षरापासून सुरू होणाऱ्या मुद्द्यांचा आधार घेण्याचा प्रयत्न केलाय. मोदी सरकारने सन्मानित केलेले तीन नेते हे विरोधी पक्षातील आहेत. ते म्हणजे भारतीय लोक दल (आता राष्ट्रीय लोक दल किंवा आरएलडी) नेते चरण सिंह, समाजवादी विचारसरणीचे कर्पूरी ठाकूर आणि काँग्रेसचे पहिले बिगर गांधी कुटुंबातून पंतप्रधान झालेले नरसिंह राव आहेत. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार पक्षाबाहेरील जुन्या मोठ्या नेत्यांनाही महत्त्व प्राप्त करून देत आहे. तसेच त्यांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करीत आहे. मग ते सरदार वल्लभभाई पटेल असो की नेताजी सुभाषचंद्र बोस ही व्यक्तिमत्त्वे सध्या भाजपाच्या केंद्रस्थानी आहेत.
हरित क्रांतीचे जनक स्वामिनाथन यांचा इंदिरा गांधींशी संबंध होता. १९६६ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच इंदिरा गांधींनी अमेरिकेचा दौरा करत भारताला अन्न उत्पादनात स्वावलंबी कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. कारण भारत हा अमेरिकेतील गव्हावर तेव्हा अवलंबून होता. त्यानंतर स्वामिनाथन यांच्या दूरदृष्टीतून गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य उत्पादन करणाऱ्या राष्ट्रात भारताचे रूपांतर झाले.
मोदींच्या या मुद्द्यातील मंडल म्हणजे त्यांच्या सरकारच्या अंतर्गत ओबीसींना दिलेले महत्त्व आहे. कारण पंतप्रधान स्वत: ओबीसी आहेत. कर्पूरी ठाकूर आणि चरण सिंह हे दोघेही मागासवर्गीय होते, कर्पूरी ठाकूर खरोखरच मंडलाच्या घटनेचे जनक होते. १९७८ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये ओबीसींसाठी २६ टक्के आरक्षण लागू केले. जेव्हा या निर्णयाला हिंसक विरोध झाला, तेव्हा त्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३ टक्के आणि महिलांसाठी आणखी ३ टक्के आरक्षण राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. ठाकूर यांना भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याला सन्मान देण्यात आला. तसेच JD(U) सर्वेसर्वा नितीश कुमार यांना भाजपाच्या गोटात परत येण्यासाठीचं ते बक्षीसही समजलं जातंय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी या समाजवादी नेत्याला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यासाठी केंद्रातील सरकारांना बरीच पत्र लिहिली होती आणि शेवटी मोदी सरकारने कर्पूरी ठाकूर यांचा सन्मान केला.
RLD प्रमुख जयंत चौधरी यांनीसुद्धा त्यांच्या आजोबांना भारतरत्न दिल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. त्यांनी त्यांचे आजोबा चरणसिंह यांना भारतरत्न दिल्याबद्दल “दिल जीत लिया (दिल जीतले!)” अशी प्रतिक्रिया दिली. आरएलडी आणि भाजपाने युतीबाबतची चर्चा जवळपास पूर्ण केल्याची चर्चा असतानाच आरएलडीला लोकसभेच्या किमान दोन आणि राज्यसभेत एक जागा मिळणार आहे. चरणसिंह यांना भारतरत्न देऊन मोदींनी ‘मंडई’साठी त्यांनी केलेल्या कामाचा गौरव केलाय. पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांमध्ये विशेषत: जाटांमधील असंतोषामुळे भाजप चिंतेत आहे. आरएलडीबरोबर युती केल्यानं जाटांची समस्या कमी होण्यास थोडी मदत मिळेल. राज्यातील लोकसभेच्या ८० पैकी २९ जागा पश्चिम उत्तर प्रदेशात आहेत. चरणसिंह हे ओबीसींच्या वाढीदरम्यान यूपीमधील काँग्रेसच्या पडझडीला जबाबदार होते आणि ते जाटांइतकेच यादवांचेही नेते होते. यूपीए सरकारमधील मंत्री दिवंगत जयपाल रेड्डी नेहमीच म्हणायचे की, उत्तर भारतात इंदिरा गांधी आणि चरण सिंह असे दोन जनतेतील नेते आहेत. खरं तर भाजपासाठी यूपीची लढत राज्यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यापुरती मर्यादित नाही, तर त्यांना सध्याच्या ७१ वरून पुढचा आकडा गाठायचा आहे.
मोदींच्या मुद्द्यातील मंदिराच्या उदाहरणाकडे पाहिल्यास अडवाणींना भारतरत्न दिल्याचं दिसेल. मोदी सरकारच्या कारकिर्दीत या दिग्गज नेत्याला बाजूला सारण्यात आलं होतं आणि कटुता निर्माण झाली होती. परंतु त्यांचा सन्मान करून मोदींनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह भाजपचे संस्थापक अडवाणी हेदेखील अयोध्या राम मंदिराच्या मागणीला राजकीय चळवळीत रुपांतरित करणाऱ्या रथयात्रेचे नेतृत्व करणारे नेते होते. अडवाणींना भारतरत्न देऊन मोदींनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उदारतेचा एक योग्य संदेश पाठवला आहे.
आता भारतीय बाजाराबद्दल बोलायचे झाल्यास ते वाढण्यास भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक नरसिंह राव यांना श्रेय दिले जाईल, ज्यांनी १९९१ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच अर्थव्यवस्था खुली करण्याचे कठोर निर्णय घेतले. पण राव यांचे महत्त्वही यात आहे. कारण दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशात त्यांचा जन्म झाल्या. विशेष म्हणजे मोदी सरकारने निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या आंध्र प्रदेशावर लक्ष केंद्रित केले आहे. १९९२ मध्ये बाबरी मशीद पडल्यानंतर गांधी घराण्याने त्यांना पंतप्रधानपदापासून दूर केले. विशेष म्हणजे त्यांचे पार्थिव AICC मुख्यालयात ठेवण्याची परवानगीही देण्यात आली नव्हती. एकीकडे मंडल आणि मंदिर संघर्ष सुरू होता आणि दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरलाही संघर्षाचा सामना करावा लागत असताना राव यांनी देशाला कधा पद्धतीने स्थैर्य मिळवून हे भाजपाने सांगितले आहे.