राज्य विधान परिषदेवरील राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीचा विषय नव्या राजवटीमध्ये चर्चेला येत असताना या माध्यमातून विधान परिषदेवर जाऊ इच्छिणाऱ्यांच्या आशा-आकांक्षा पल्लवीत झाल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, भाजपला तब्बल २६ वर्षांनंतर वरील प्रवर्गातून आपल्या समर्थकांची परिषदेवर वर्णी लावण्याची संधी मिळणार आहे.

१२ जागा गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असून, त्यासाठी आधीचे आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात बराच संघर्ष झाला. या सरकारने पाठविलेल्या नावांना राज्यपालांनी मंजुरी दिली नाही. आता राज्यात भाजपच्या प्रभावाखालील नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर आधीच्या १२ नावांऐवजी नव्या नावांची शिफारस केली जाणार असून त्यात भाजपच्या पसंतीची किमान नऊ नावे असतील, असे सांगितले जात आहे.राज्यात १९९५ साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर वर्षभरात १९९६ मध्ये राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवडीचा विषय समोर आला तेव्हा दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी सहा जणांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली होती. त्यात मराठवाड्यातून औरंगाबादचे निष्ठावान कार्यकर्ते शालीग्राम बसैय्ये आणि हिंगोलीचे शांतारामबापू करमळकर यांना भाजपने संधी दिली होती.या सदस्यांची मुदत २००२ साली संपली तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तारुढ होते. तेव्हापासून पुढील १८ वर्षे राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये आघाडीशी संबंधितांचा समावेश होता. दीड वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने पुन्हा १२ जणांची शिफारस केली होतीे; पण ही नावे राज्यपाल कोश्यारी यांनी थांबवून ठेवली होती.

ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्षामध्ये वरील १२ सदस्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यास केला जाणारा विलंब हाही एक महत्त्वाचा मुद्दा होता. आता ठाकरे सरकार सत्तेतून गेल्यामुळे राज्यपाल नियुक्त १२ विधान परिषद सदस्यांच्या निवडीचा विषय नव्या सरकारच्या, त्यातही भाजपच्या कक्षेत आल्यानंतर आमदारकीसाठी वेगवेगळ्या भागातील भाजप कार्यकर्त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठवाडा विभागाचा विचार करता, सध्या भाजपतर्फे नांदेडचे राम पाटील रातोळीकर, लातूरचे रमेशअप्पा कराड हे विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुजितसिंह ठाकूर हे नुकतेच निवृत्त झाले. आता मराठवाडा विभागाला प्रतिनिधित्व द्यायचे झाल्यास भाजपला औरंगाबाद जिल्ह्यातून एखाद्या नावाचा विचार करावा लागेल, असे सांगितले जात आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेले शिरीष बोराळकर हे एक दावेदार आहेत. नांदेडमधून डॉ.अजित गोपछडे यांचेही प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले सुभाष साबणे हेही विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छूक असून ते सध्या मुंबईतच आहेत.