Congress : काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांसाठी तसंच कार्यकर्त्यांसाठी २४ अकबर मार्ग हा पत्ता म्हणजे परवलीचा झाला आहे. कारण पाच दशकांहून अधिक काळ या ठिकाणी असलेल्या शुभ्र बंगल्यात AICC अर्थात काँग्रेसचं मुख्यालय आहे. दिल्ली शहराच्या हृदयातच ही वास्तू आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. अनेक ऐतिहासिक प्रसंगांची साक्षीदार असलेली ही वास्तू आहे. मात्र आता हा पत्ता बदलणार आहे. कारण काँग्रेसचं मुख्यालय आता नवी दिल्लीतील ९ अ, कोटला रोड या ठिकाणी असेल. १५ जानेवारीला काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन होणार आहे. देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा पत्ता बदलणार आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आता नव्या मुख्यालयात काम करताना दिसतील. मात्र पाच दशकांहून अधिक काळ उभ्या असलेल्या वास्तूचा इतिहास मोठा आहे. या वास्तूने अनेक प्रसंग पाहिले आहेत.

२४ अकबर रोड येथील मुख्यालयाने पाहिलेत अनेक प्रसंग

१९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या हा प्रसंग या वास्तूने पाहिला आहे. इतकंच नाही १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींचं पंतप्रधान होणं, पी. व्ही. नरसिंह राव यांचा कार्यकाळ, काँग्रेस पक्षाची झालेली वाढ, अनेक उतार चढाव या सगळ्या घटनांची ही वास्तू साक्षीदार आहे. २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात सोनिया गांधींचं नेतृत्वही या वास्तूने पाहिलं आहे.

१५ जानेवारीला नव्या मुख्यालयाचा उद्घाटन सोहळा

आता मकरसंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारीच्या दिवशी काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन होणार आहे. सहा मजल्याचं हे मुख्यालय आहे. काँग्रेस पक्षाला दीन दयाळ उपाध्याय मार्गावर ही जागा मिळाल्याने त्यांनी ही नवी वास्तू या ठिकाणी बांधली आहे. भाजपाने जसं मुख्यालय बदललं त्याचप्रमाणे काँग्रेसनेही मुख्यालय बदललं आहे. खरंतर या वास्तूचं भूमिपूजन हे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना २००९ मध्ये झालं होतं. मात्र या वास्तूचं बांधकाम पूर्ण व्हायला १५ वर्षे लागली. सोनिया गांधींच्या हस्ते या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह सगळ्या दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. नव्या मुख्यालयाला इंदिरा गांधी भवन असं नाव देण्यात आलं आहे. या कार्यक्रमात देशभरातले ४०० दिग्गज नेते येतील तसंच अनेक नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचीही उपस्थिती असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९७८ या वर्षी २४ अकबर रोड या ठिकाणी आलं मुख्यालय

काँग्रेसचं अकबर रोड येथील मुख्यालय १९७८ मध्ये झालं होतं. आणीबाणीनंतर ज्या निवडणुका झाल्या त्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसचं मुख्यालय हे २४ अकबर रोड या ठिकाणी हलवण्यात आलं होतं. आता इतक्या वर्षांनी काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलला आहे. १९७८ हे असं वर्ष होतं ज्यावेळी काँग्रेस पक्ष स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदा सत्तेबाहेर होता. तसंच काँग्रेस पक्षात फूटही पडली होती. इंदिरा काँग्रेस या पक्षाला तेव्हा मुख्यालय नव्हतं. ज्यानंतर २४ अकबर रोड हा नवा पत्ता १९७८ मध्ये निर्माण झाला होता. आता इतक्या वर्षांनी काँग्रेसचं मुख्यालय बदलतो आहे.