नागपूर : राज्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाचा सर्वात मोठा राजकीय शत्रू कोण असेल तर ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार. त्यांच्यावर टीका केल्याशिवाय भाजपचा दिवसच उजाडत नाही. पवार यांची जनमानसातील प्रतिमा मलिन केल्याशिवाय आपण राज्याच्या राजकारणात स्थिरावू शकत नाही हे भाजपच्या लक्षात आल्यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडेपासून तर विद्यमान राज्य व केंद्रातील नेतृत्वापर्यंत सर्वांनी पवार यांच्यावर शाब्दिक हल्ले अधिक प्रखर केले. त्यांचा पक्ष फोडला, घरही फोडले नको ते आरोप इतरांकडून करवून घेतले.. याला अपवाद ठरल् ते भाजप नेते नितीन गडकरी. भाजप सत्तेत नसताना पासून पवार- गडकरी या दोन भिन्न राजकीय विचारसरणीच्या नेत्यांमध्ये सख्य आहे. गडकरी दहा वर्षापासून सत्तेत आहेत आणि पवार सत्तेबाहेर. तरीही दोन्ही नेत्यांमधील स्नेह कायम आहे. अलीकडेच गडकरी यांच्या ‘ॲग्रोव्हीजन’ फाऊंडेशनचा शेतकरी अभ्यास दौरा झाला. त्यासाठीही निवड केली ती पवारांच्या बारामतीची. गडकरींच्या पवार प्रेमाची ही प्रचिती मानली जाते.

२०१४ पासून (महाविकास आघाडीची सत्ता वगळता)केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असली तरी त्यापूर्वी दोन्ही ठिकाणी काँग्रेस आघाडीचे सरकार होते आणि शरद पवार हे सत्तेतील प्रमुख नेते होते. त्यावेळी विरोधी पक्षात असलेला भाजप सत्ताप्राप्तीसाठी संघर्ष करणारा पक्ष होता. गडकरी हे राज्यातील भाजपचे प्रमुख नेते होते. तेंव्हा पासून त्यांचे आणि शरद पवार यांचे सलोख्याचे संबध आहेत. पवार केंद्रात कृषीमंत्री असताना गडकरी यांनी नागपूरला आयोजित केलेल्या कृषीप्रदर्शनाला भेट देण्यासाठी येत असत. राज्यात राष्ट्रवादीची युती काँग्रेससोबत असतानाही अनेक स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राष्ट्रवदीने काँग्रेसला दूर ठेवून भाजपशी युती केल्याचे अनेक उदाहरणे आहेत.याचे मुळ पवार-गडकरी स्नेहसंबंधात असल्याचीचर्चा त्यावेळी केली जात होती. राजकारणात पवार भाजपवर सडकून टीका करीत असले तरी गडकरी यांच्याबाबत चांगलेच बोलतात. गडकरीही काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करतात पण पवारांबाबत बोलताना ते आदरपूर्वक शब्द वापरतात. नागपूरमध्ये पक्षाच्याच एका कार्यक्रमात त्यांनी पवार यांच्या राजकीय चातुर्याचे केलेले कौतुक चांगलेच गाजले होते.

२०१४ नंतर राज्यात भाजपची सत्ता आल्यावर प्रदेश भाजपकडून पवार विरोधाची धार तीव्र झाली असली. पातळीसोडून भाजप नेते टीका करीत असले तरी अनेक कार्यक्रमात गडकरी- पवार एका व्यासपीठावर आलेले नागपूरकरांनी बघितले आहे. नागपुरातील काही कार्यक्रमात आणि राज्यातही एका व्यासपीठावर आले. पवार यांनी गडकरी यांनी रस्ते बांधणी क्षेत्रातील कामांची जाहीरपणे स्तुस्ती अनेकदा केली तर गडकरी यांनी पवार यांच्या कृषी क्षेत्रातील कामाचे कौतूक केले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी गडकरी यांच्या अँग्रोव्हिजन फाउंडेशनने बारामतीची निवड केली. शरद पवार प्रमुख यांचे प्रभुत्व असलेल्या वसंतदादा श्युगर इन्स्टिट्यूटची विदर्भात शाखा सुरू करण्यासाठी गडकरी यांनी पुढाकार घेतला. येत्या २९ जुलैला सी.डी. देशमुख स्मृती पुरस्कार शऱ्द पवार यांच्याच हस्ते गडकरी यांना नवी दिल्ली येथे होणाऱ्या समारंभात दिला जाणार आहे. काही वर्षापूर्वी नागपुरात गडकरींचा सर्वपक्षीय सत्कार झाला होता त्याला पवार आवर्जून उपस्थित होते. संघ आणि भाजप यांच्या हिटलिस्टवर पवार असले तरी संघ स्वयंसेवक असलेल्या गडकरींना मात्र पवार यांच्याविषयी नेहमीच आस्था राहिली आहे. ॲग्रोव्हीजन फाऊंडेशनचा बारामती दौरा हा याच मालिकेतील आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामती दौरा कशासाठी ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख मार्गदर्शक असलेल्या ॲग्रोव्हीजन फाऊंडेशनतर्फे विदर्भातील प्रगतशील शेतकऱ्यांचा बारामती येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करून कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलांचे प्रत्यक्ष निरीक्षण व ज्ञान मिळवणे हा या दौऱ्याचा उद्देश होता. अभ्यास दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्रातील एआय तंत्रज्ञानाने विकसित उसाच्या मॉडेल प्लॉटला भेट दिली. भैय्यासाहेब पवार सभागृहात झालेल्या सत्रात एआयवर सादरीकरम झाले. अध्यक्षस्थानी केविकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पवार होते. त्यांनी गडकरी यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले.