पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता देशातील सर्वच राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रादेशिक पक्ष आपापल्या स्तरावर तयारी करीत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून, पक्षबांधणी, तसेच लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असतानाच आता या पक्षात वयोमर्यादेचा मुद्दा उपस्थित झाला आहे; ज्या नेत्यांचे वय जास्त झालेले आहे, त्यांनी आता तरुण नेत्यांना संधी द्यावी, अशी भावना काही नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे सध्या तृणमूल काँग्रेस पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

१० खासदारांचे वय हे ६५ वर्षांपेक्षा अधिक

तृणमूल काँग्रेसचे एकूण २३ खासदार आहेत. त्यातील १० खासदारांचे वय हे ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे; तर पाच खासदारांचे वय हे ७५ वर्षांपेक्षा अधिक आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वयाचा मुद्दा चर्चेत आल्यामुळे जास्त वय झालेल्या अशा अनेक नेत्यांबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Eknath shinde mahayuti marathi news
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या मेळाव्याकडे मित्र पक्षांची पाठ
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
jd vance refuses to accept trump s 2020 defeat in vp debate
ट्रम्प यांचा पराभव झालाच नव्हता; रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपद उमेदवार जे. डी. व्हॅन्स यांचा दावा
Sharad Pawars big statement about increasing oppression of women
महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
BJP leaders Demand to Give a chance to the old workers while pampering the new ones
नव्यांचे लाड करताना जुन्या कार्यकर्त्यांनाही संधी द्या! भाजप नेत्यांची नेतृत्वाकडे मागणी
supriya sule on balasaheb thorat cm post statement
Supriya Sule : “राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल”, बाळासाहेब थोरातांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या…
pm Narendra modi birthday
PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज ७५ व्या वर्षात पदार्पण; वाढदिवस कसा साजरा करणार?
Vijay Wadettiwar and Sanjay Gaikwad
गायकवाड यांना वडेट्टीवार यांचे प्रत्युत्तर ,म्हणाले ‘पन्नास खोके घेणाऱ्यांना सत्तेची मस्ती’

अभिषेक बॅनर्जी यांनी काय भूमिका घेतली?

तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष हे माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना सर्वप्रथम वयाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानंतर पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांनी यावर भूमिका व्यक्त केली. कुणाल घोष यांनी वयाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे द्वितीय क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीदेखील घोष यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. ४ डिसेंबर रोजी माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना ते म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात काम करण्यासाठी कमाल वयाची मर्यादा असते. राजकारणातही हा नियम असला पाहिजे. प्रत्येक पक्षाला अनुभवी नेत्याची गरज असतेच. त्यांचा अनुभव पक्षाच्या कामी येतो. मात्र वय जसजसे वाढते, तसतशी या नेत्यांची कार्यक्षमता कमी होत जाते.

तरुण नेत्यांचा अभिषेक बॅनर्जी यांना पाठिंबा

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना पक्षाच्या द्वितीय क्रमांकाच्या नेत्याने वयोमर्यादेवर भाष्य केल्यामुळे आमदार आणि खासदारांमध्ये सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सुगता रॉय, सुदीप बंडोपाध्याय (६८) आदी नेत्यांनी या संदर्भात ममता बॅनर्जी याच काय तो निर्णय घेतील, अशी भूमिका घेतली आहे; तर तुलनेने कमी वय असलेल्या नेत्यांनी अभिषेक बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे.

तृणमूल काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नावे

ज्या खासदारांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे, त्यांना पुन्हा तिकीट मिळणार का, असा प्रश्न तृणमूल काँग्रेसमध्ये विचारला जातोय. चौधरी मोहन जाटुआ (८५), शिशिर अधिकारी (८२), सौगत रॉय (७७), शत्रुघ्न सिन्हा (७७), सुदीप बंडोपाध्याय (७५), प्रसून बंडोपाध्याय (६८), असित मल (६८), कल्याण बंडोपाध्याय (६६), माला रॉय (६५) व सुनील मोंडोल (६५) अशी तृणमूल काँग्रेसच्या काही ज्येष्ठ खासदारांची नावे आहेत.

“वयाचा विचार न करता…”

याच मुद्द्यावर तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनी प्रतिक्रिया दिली. “पक्षात तरुण, तसेच अनुभवी अशा दोन्ही नेत्यांची गरज असते. अनुभवी नेत्याचे पक्षात वेगळे स्थान असते. खासदाराला राष्ट्रीय मुद्द्यांवर विचार करावा लागतो. देशाला संबोधित करताना खासदाराला पक्षाची भूमिका मांडावी लागते. त्यासाठी अनुभव महत्त्वाचा असतो. त्यामुळे वयाचा विचार न करता, एखाद्या नेत्याला लोकांमध्ये किती मान्यता आहे, हे लक्षात घेऊन तिकीट दिले जावे,” असे हकीम म्हणाले.

“वरिष्ठ नेत्यांनी सल्लागाराची भूमिका घेतली पाहिजे”

तृणमूल काँग्रेसचे नेते तथा माजी परिवहन मंत्री मदन मित्रा यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली. “सचिन तेंडुलकरला संधी मिळावी म्हणून सुनील गावसकर बाजूला झाले. रोहित शर्माला संधी मिळावी म्हणून एम. एस. धोनी निवृत्त झाला. वरिष्ठ नेत्यांनी सल्लागाराची भूमिका घेतली पाहिजे, असे मित्रा म्हणाले. तर, विशिष्ट वय झाल्यानंतर मोठ्या नेत्यांनी तरुण नेत्यांना संधी दिली पाहिजे. मी कोणाचेही नाव घेणार नाही; पण ज्येष्ठ नेत्यांनी स्वत:च हा निर्णय घेतला पाहिजे, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे नेते तापस रॉय यांनी दिली.

ममता बॅनर्जी यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही

दरम्यान, पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी वयाच्या या मुद्द्यावर अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मात्र, ममता बॅनर्जी या पक्षातील सर्वोच्च नेत्या आहेत. त्या योग्य तो निर्णय घेतील, अशी भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केली.