भारत-चीनच्या सीमा वादावरुन एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पूर्व लडाखमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या परिस्थिती बद्दल बोलू शकले असते, असे ओवैसी यांनी म्हटले आहे. “आपले पंतप्रधान कारगिलमध्ये होते, तर राजनाथ सिंह यांनी काश्मीरला भेट दिली. दोघेही पूर्वेकडे चीन सीमेपर्यंत काही मैलांवर जाऊन तेथील परिस्थितीबद्दल बोलू शकले असते. त्या भूभागावर अजुनही आपले नियंत्रण आहे”, अशा आशयाचे ट्वीट ओवैसी यांनी केले आहे. या मुद्द्यावर संसदेचं विशेष सत्र बोलवण्याची मागणीदेखील ओवैसी यांनी केली आहे.

“दहशतवाद्यांवर बंदी घालण्याची वेळ येते तेव्हा…” जयशंकर यांनी UNSC ला सुनावले खडेबोल! म्हणाले, “२६/११ च्या मुख्य सूत्रधारांना…”

२४ ऑक्टोबरला कारगिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलासोबत दिवाळी साजरी केली. तर काश्मीरच्या बडगाममध्ये राजनाथ सिंह यांनी शौर्य दिवस कार्यक्रमाला हजेरी लावली होती. “१९४७ पासूनचा प्रदेश परत मिळवण्याची भाषा करण्याआधी त्यांनी २०२० पासून लडाखमधील गमावलेली जमीन परत का मिळवली नाही? दोन हजार नाही तर किमान एक हजार चौरस किलोमीटर जमिनीवर गेल्या ३० महिन्यांमध्ये चीनने नियंत्रण मिळवले आहे”, असा दावा ओवैसी यांनी केला आहे.

“जेपसांग आणि देमचोकमधील परिस्थिती काय आहे? या भागातील परिस्थिती आपण यशास्थिती स्वीकारणार आहोत की हा प्रदेश परत आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी योजना आखणार आहोत?”, असा सवालही ओवैसी यांनी केला आहे.

भारत-चीन सीमाभागात गेल्या दोन वर्षांपासून चीनकडून घुसखोरी वाढली आहे. या भागात चीननं ६० हजार सैनिक तैनात केले आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चीनने पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. या संदर्भात दोन्ही देशांमध्ये द्वीपक्षीय वाटाघाटी झाल्या आहेत. यानंतर काही भागांमधून चीनने सैन्य मागे घेतले आहे.