लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला लागलेली गळती अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे पक्ष सोडून जाणारे नेते पक्षावरचा राग अधिक तीव्रपणे व्यक्त करताना दिसत आहेत. दुसरीकडे काही नेते पक्षामध्ये राहूनही पक्षावरचा राग उघडपणे व्यक्त करत आहेत. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे अरविंदर सिंग लवली यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा! एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असताना काँग्रेसमधील काही नेत्यांची ही नाराजी वाढतच चालली आहे. लवली सिंग यांनी पक्षामध्येच राहणार असल्याची घोषणा केली असली तरी ते लवकरच भाजपामध्ये जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सोमवारी (२९ एप्रिल) घडलेली आणखी एक घटना काँग्रेसला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बाम यांनी ऐनवेळी आपले नामांकन मागे घेतले असून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. अक्षय कांती बाम यांच्या आधीही अनेकांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मात्र, पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळालेली असताना अशाप्रकारे थेट विरोधी पक्षात प्रवेश करण्याची घटना चर्चेस पात्र ठरली आहे. गेल्या वर्षभरात काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. यामध्ये मिलिंद देवरांपासून ते अशोक चव्हाण यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश आहे. २०२४ मध्ये काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे, याची माहिती आता आपण घेणार आहोत.

हेही वाचा : खलिस्तानसमर्थक अमृतपाल सिंग तुरुंगातून निवडणूक लढवू शकतो का?

मिलिंद देवरा


मिलिंद देवरा यांनी गेल्या जानेवारीमध्ये काँग्रेस पक्ष सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये गुणवत्तेला महत्त्व दिले जात नाही; तसेच इथे फक्त उद्योगपतींना शिव्या दिल्या जातात, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला. देवरा कुटुंब गेली ५५ वर्षे गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय मानले जाते. मिलिंद देवरा हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे जवळचे सहकारीही होते. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारे पक्ष सोडल्यामुळे चर्चांना उधाण आले. भारत जोडो न्याय यात्रेवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपा या गोष्टीचा वापर करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला होता. देवरा यांच्यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेस पक्ष सोडला.

अशोक चव्हाण

१२ फेब्रुवारी रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पक्षाला रामराम केला. चव्हाण कुटुंबीय आणि काँग्रेसचे नाते फारच जुने आहे. दोन मुख्यमंत्रिपदे मिळालेल्या या कुटुंबाने पक्षाबरोबरचे नातेसंबंध संपुष्टात आणल्यामुळे उलटसुलट चर्चा झाली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याच महिन्यात अशोक चव्हाण यांना भाजपाकडून राज्यसभेवर पाठविण्यात आले. गेल्या दहा वर्षांमध्ये काँग्रेस सोडणारे ते नववे माजी मुख्यमंत्री ठरले आहेत. याआधी अमरिंदर सिंग, गुलाम नबी आझाद, दिवंगत अजित जोगी, एस. एम. कृष्णा, नारायण राणे, विजय बहुगुणा आणि गिरीधर गमंग या माजी मुख्यमंत्र्यांनीही पक्ष सोडलेला आहे.

२०१५ मध्ये पक्ष सोडणारे ओडिशाचे माजी मुख्यमंत्री गिरीधर गमंग यांनी गेल्या जानेवारीमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडमध्ये आपला जम बसवण्यासाठी भाजपाने अशोक चव्हाण यांना आपल्या पक्षात घेतले असल्याचे म्हटले जाते.

नवीन जिंदाल

गेल्या मार्च महिन्यामध्ये उद्योगपती नवीन जिंदाल यांनीही काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. हरयाणामधील कुरुक्षेत्र मतदारसंघामधून त्यांना भाजपाकडून लोकसभेचे तिकीट दिले गेले. ‘जिंदाल स्टील अँड पॉवर’चे अध्यक्ष नवीन जिंदाल हे दोन वेळा काँग्रेसचे खासदार राहिले आहेत.

याबाबत एक्सवर त्यांनी लिहिले होते की, “आज माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाचा दिवस आहे. भाजपामध्ये गेल्याचा मला अभिमान वाटतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मला देशासाठी काम करता येईल. पंतप्रधान मोदींचे ‘विकसित भारता’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मलाही योगदान देता येईल, याचा मला आनंद आहे.”

अनिल शर्मा

गेल्या मार्च महिन्यामध्ये बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अनिल शर्मा यांनीही काँग्रेस पक्ष सोडला. राष्ट्रीय जनता दलाबरोबर काँग्रेसने केलेली युती विनाशकारी असल्याचा दावा त्यांनी केला होता. गेल्या दशकभरात बिहार काँग्रेसच्या अनेक प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सोडला आहे. अनिल शर्मा काँग्रेस पक्ष सोडणारे चौथे प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत. गेल्या एप्रिलमध्ये अनिल शर्मा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे जातीयवादी मानसिकतेचे असल्याचा आरोप त्यांनी केला.

विजेंदर सिंग

३ एप्रिल रोजी ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही पक्षाला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आपण स्वगृही परतत असल्याचे विधान त्याने केले. भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या आदल्याच दिवशी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर भाजपामध्ये गेल्यावर तो म्हणाला की, “हे ट्विट केल्यानंतर मी झोपी गेलो. जेव्हा मी झोपेतून उठलो तेव्हा मला अशी जाणीव झाली की, मी काहीतरी चुकीचे करतो आहे. आपण भाजपामध्ये प्रवेश केला पाहिजे, असे मला जाणवले.”

विजेंदर सिंग हा मूळचा हरयाणाचा आहे. जाट समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विजेंदरने २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर दक्षिण दिल्ली मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती.

गौरव वल्लभ

गौरव वल्लभ हे काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते मानले जात होते. टीव्हीवरील एका वादविवादात त्यांनी भाजपाच्या संबित पात्रा यांना निरुत्तर केल्यानंतर ते विशेष प्रसिद्धीस आले होते. ४ एप्रिल रोजी काँग्रेस दिशाहीन झाली असल्याचा आरोप करत त्यांनी पक्षाला रामराम केला. पक्षाने मूलभूत तत्त्वांपासून फारकत घेतली आहे. तसेच काँग्रेस पक्ष भरकटत चालला असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले की, “मी सनातन धर्माविरोधात घोषणा देऊ शकत नाही. तसेच उठसूठ ‘वेल्थ क्रिएटर्स’ना शिव्या घालणे माझ्याकडून होणार नाही.”

हेही वाचा : कलम ३७० वर काँग्रेसचे मौन तरीही आम्ही समजून घेतोय; ओमर अब्दुल्लांचं विधान

संजय निरुपम

पक्षविरोधी वक्तव्य आणि बेशिस्त वर्तन केल्याबद्दल काँग्रेसने संजय निरुपम यांना अलीकडेच पक्षातून काढून टाकले. मी आधीच राजीनामा दिला होता आणि त्यानंतर पक्षाने ही कारवाई केल्याचे विधान त्यांनी केले. गेल्या अनेक वर्षांपासून संजय निरुपम काँग्रेसमध्ये होते. मुंबई ईशान्य मतदारसंघामधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा त्यांना होती.