लोकसभा निवडणुकीची घोषण झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष मतदानालाही सुरुवात होणार आहे. याच अनुषंगाने काँग्रेसकडून काही उमेदवारांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, काँग्रेसने अद्यापही अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे या दोन्ही जागांवर गांधी घराण्यातील व्यक्ती निवडणूक लढवणार की बाहेरच्या व्यक्तीला संधी दिली जाईल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच या दोन्ही जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करायला काँग्रेसला उशीर का होतोय, याविषयी विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार या दोन्ही ठिकाणी मतदानाला अद्याप वेळ आहे. २० मे रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३ मे आहे. त्यामुळे या जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही, ही काँग्रेस पक्षाची रणनीती आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे काँग्रेसने उत्तर प्रदेशातील महाराजगंज, देवरिया, बांनसगाव आणि वाराणसी या जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी मतदान होणार आहे.

हेही वाचा – नफ्यापेक्षा दुप्पट रोखे दान; आठ कंपन्यांचा प्रताप

२०१९ मध्ये काँग्रेसने आपल्या पहिल्याच यादीत उत्तर प्रदेशातील ११ आणि गुजरातमधील चार जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. यामध्ये अमेठी आणि रायबरेलीच्या जागांचाही समावेश होता. रायबरेलीतून काँग्रेसने सोनिया गांधी आणि अमेठीतून राहुल गांधी यांना उमेदवारी दिली होती. याशिवाय राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत अमेठीत भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता.

दरम्यान, आता २०२४ मध्ये सोनिया गांधी यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रायबरेलीची जागा खाली झाली आहे. या जागेवरून राहुल गांधी निवडणूक लढवतील की प्रियांका गांधी वाड्रा, याविषयी राजकीय चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसने या दोन्ही जागांवरील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसने ८ मार्च रोजी जाहीर केलेल्या पहिल्या यादीनुसार राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते लवकरच आपला उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत.

या संदर्भात बोलताना काँग्रेसच्या नेत्याने सांगितले की, अमेठी आणि रायबरेलीतून कोणी निवडणूक लढवावी, याबाबतचा निर्णय राहुल गांधी आणि सोनिया गांधी घेतील. महत्त्वाचे म्हणजे प्रियांका गांधी वाड्रा यांच्या निवडणूक लढण्यासंदर्भातही पक्षात दोन प्रकारची मते आहेत. या संदर्भात बोलताना काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले, “रविवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत प्रियांका गांधी यांची उपस्थिती म्हणजे त्या निवडणूक लढवू शकतात, याचे संकेत आहेत. अन्यथा सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्या सभेला हजर राहिल्या नसत्या”; मात्र काँग्रेसच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा – गुजरातमध्ये भाजपा अडचणीत? काय आहे क्षत्रिय- दलित वाद?

काँग्रेसचे अन्य एक नेते म्हणाले, राहुल गांधी यांनी अमेठीतून निवडणूक न लढल्यास, चुकीचा राजकीय संदेश जाईल. त्यांचे अमेठीतून न लढण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. जर त्यांनी अमेठीतून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, तर भाजपाला काँग्रेसविरुद्ध प्रचाराला आणखी एक मुद्दा मिळेल, त्याचे राजकीय परिणामही होतील.

महत्त्वाचे म्हणजे अमेठी किंवा रायबरेलीतून गांधी कुटुंबीयांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यास, काँग्रेस पक्ष दक्षिणेकडील पक्ष आहे, या चर्चेला आणखी बळ मिळेल. कारण दक्षिणेतील कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांत काँग्रेसचे सरकार आहे. शिवाय ज्या उत्तरेकडील राज्याच्या भरवश्यावर सत्ता मिळू शकते, त्या राज्यांपैकी केवळ हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amethi and rae bareli candidate name still in wating because of rahul and priyanka gandhi know reason spb
First published on: 03-04-2024 at 12:32 IST