मुंबई : मुंबई भाजप अध्यक्षपदी अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी येथे केली. आगामी मुंबई महापालिकेतील शिवसेनेची (उद्धव ठाकरे) सत्ता उलथून टाकून भाजपचा महापौर निवडून आणण्याचा पक्षाचा निर्धार असून त्यादृष्टीने साटम यांची नियुक्ती महत्वाची आहे. भाजपने मराठी, आक्रमक स्वभावाच्या आणि मूळ पक्षातील नेत्याची निवड केली असून साटम हे मराठा समाजातील आहेत.
भाजपच्या दृष्टीने मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची व अटीतटीची असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रत्येक गोष्टीवर काटेकोर लक्ष ठेवून आहेत. महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी सध्याचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडेच धुरा ठेवावी का, असा वरिष्ठ नेत्यांचा विचार होता. त्यामुळे तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची मुदत संपल्यावरही मंत्रीपदही सांभाळणाऱ्या शेलार यांच्याकडे कार्यभार होता. त्यांनी निवडणूक समिती आणि लोकसभा मतदारसंघनिहाय प्रभारींच्या नियुक्त्याही केल्या होत्या. पण शेलार यांनी नवीन अध्यक्षाच्या नियुक्तीची मागणीही पक्षाकडे अनेकदा केली होती. मंत्री असताना चौथ्यांदा पुन्हा अध्यक्षपद शेलार यांच्याकडे ठेवल्यास पक्षात अन्य नेते या पदासाठी पात्र नाही का, अशी चर्चाही होत होती. त्यामुळे फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आणि फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यावर साटम यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले. मुंबईत सध्या मराठीचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने मराठी चेहऱ्याला संधी देऊन भाजपवर अमराठी हा शिक्का बसणार नाही याची खबरदारी घेतली आहे.
मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अतुल भातखळकर व साटम यांची नावे चर्चेत होती. पण दरेकर, लाड हे मूळ भाजपचे नसून अन्य पक्षांमधून आले आहेत. बाहेरून आलेल्या नेत्याची प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबई भाजप अध्यक्षपदी अजून तरी पक्षाने नियुक्ती केलेली नाही. या पदावर मूळ भाजपच्या नेत्यालाच वरिष्ठ नेत्यांनी पसंती दिली आहे. त्यामुळे तरुण, आक्रमक, मराठी, उच्च शिक्षित व मराठा समाजातील साटम यांची निवड वरिष्ठ नेत्यांनी केली.
साटम यांचा अल्पपरिचय
भाजप आमदार साटम हे ऑक्टोबर २०१४ पासून सलग तीन वेळा अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मुंबईत १५ ऑगस्ट १९७६ रोजी जन्मलेल्या साटम यांनी १९९८ मध्ये मुंबई विद्यापीठाअंतर्गत असलेल्या मिठीबाई महाविद्यालयातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात पदवी मिळविली. पुढे त्यांनी मुंबईतील महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूटमधून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (कार्मिक) ची पदव्युत्तर पदवी मिळविली. राजकारणात येण्यापूर्वी साटम यांनी टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये मानव संसाधन व्यावसायिक म्हणून काम केले. ते श्री श्री रविशंकरजी यांचे अनुयायी आहेत. साटम यांनी राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी २००४ मध्ये कॉर्पोरेट नोकरी सोडली. साटम यांनी जुहू बीच सुशोभीकरणासह अंधेरी पश्चिम येथील नागरी सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून विविध नागरी विकास प्रकल्पांमध्ये पाठपुरावा केला.
भाजपची मुंबईत समर्थपणे घोडदौड – फडणवीस
साटम यांच्या निवडीची घोषणा केल्यावर फडणवीस म्हणाले, शेलार यांनी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी उत्तम सांभाळली. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत आणि गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये उत्तम काम केले. मंगलप्रभात लोढा यांनीही उत्तम रितीने कार्यभार सांभाळला. त्यांच्यानंतर पुन्हा शेलार यांच्याकडे धुरा देण्यात आली आणि विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. साटम हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते नगरसेवकही होते. साटम यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात संघटनात्मक जबाबदाऱ्याही यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक शैली अशी त्यांची प्रतिमा आहे. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबईत घोडदौड कायम राखेल. मुंबईत पुन्हा महायुतीची सत्ता येईल हा मला विश्वास आहे.