तेलंगणा वगळता छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम या राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकीचा प्रचार आता संपलेला असून भाजपाने आपला मोर्चा लोकसभा निवडणुकीकडे वळवला आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी या पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये सभेला संबोधित करत लोकसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. या सभेत बोलताना शाह यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए (Citizen Amendment Act – CAA) बद्दल मोठे विधान केले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात राजकीय हिंसाचार, भ्रष्टाचार, घुसखोरी वाढली- अमित शाह
सभेला संबोधित करताना केंद्र सरकार सीएए कायदा लागू करणार आहे, हा कायदा लागू करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे अमित शाह म्हणाले. यासह त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली. ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात राजकीय हिंसाचार, भ्रष्टाचार, घुसखोरी, तुष्टीकरणाचे राजकारण वाढले आहे; त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून लावा, असे आवाहनही अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला केले.
“भाजपा दोन तृतीयांश जागांवर विजयी होणार”
अमित शाहांच्या सभेदरम्यान श्रोते मोठ्याने घोषणा देत होते. याच घोषणांचा संदर्भ देत, सध्या पश्चिम बंगालच्या जनतेला बदल हवा आहे. पश्चिम बंगालमधील २०२६ सालच्या विधानसभा निवडणुकीत या राज्यात भाजपा दोन तृतीयांश जागांवर विजयी होणार आहे, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला. २०२४ सालच्या या निवडणुकीत भाजपाची कामगिरी उत्तम असणार आहे. आगामी काही महिन्यांत होणारी लोकसभेची निवडणूक ही पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची दिशा ठरवणार आहे, असेही अमित शाह म्हणाले.
“ममता बॅनर्जी कायद्याला विरोध करतात”
ममता बॅनर्जी सीएए कायद्याला विरोध करतात. मात्र, या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे, त्याला कोणीही रोखू शकणार नाही. या कायद्याच्या लाभार्थ्यांना नागरिकत्व मिळवण्याचा अधिकार आहे, असे अमित शाह म्हणाले.
२०१९ सालच्या निवडणुकीत भाजपाचा १८ जागांवर विजय
दरम्यान, भाजपाचा २०१९ सालच्या निवडणुकीत ४२ पैकी १८ जागांवर विजय झाला होता. अमित शाह यांनी या भाषणाच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.