अमरावती : अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी बहुसदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. कुणाच्या प्रभागात नवे भाग जोडले गेले, तर कुणाच्या पारंपरिक क्षेत्राचे तुकडे झाले. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि पक्ष दोघांनाही नव्या समीकरणांचा विचार करावा लागत आहे. या प्रभाग रचनेनंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये फोडाफोडीचे राजकारण आणखी तापणार आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना सर्व प्रकारची रसद पुरवून आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रभाग रचनेनंतर नव्या रणनीतीची आखणी केली जात आहे.

अमरावती महापालिकेची निवडणूक तब्बल आठ वर्षांनंतर होत आहे. मध्यंतरीच्या काळात राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर राजकीय परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत. गेल्या निवडणुकीत माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे भाजपची धुरा होती. आता डॉ. देशमुख हे काँग्रेसमध्ये आहेत. माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे भाजपची सूत्रे आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आमदारद्वय संजय खोडके आणि सुलभा खोडके यांचे बळ लाभले आहे. शिवसेना शिंदे गटाने माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांना पक्षात घेऊन कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न चालवला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला नव्याने बांधणी करावी लागत आहे.

फोडाफोडीचे राजकारण यापुर्वीच सुरू झाले असले, तरी येत्या काळात त्याला गती मिळण्याची चिन्हे आहेत. राजकीय बळ, पैसा देणाऱ्या पक्षातच प्रवेश करण्याची अनेकांची धडपड दिसून आली आहे. पक्षांकडून देखील प्रभावी उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय सामना रंगणाची चिन्हें आहेत. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट यांच्यात सध्या उमेदवार फोडाफोडीवर लक्ष केंद्रित आहे. मात्र, प्रभागात नेमके कोणते भाग आले, यावर इच्छुक पुढील निर्णय घेणार आहेत. आता कोणत्याही पक्षातील उमेदवार असो तो प्रभावी असला, तर आपल्याकडेच खेचण्याचा डाव टाकला जात आहे.

पारंपरिक मतदारसंघाचे भाग वेगवेगळ्या प्रभागांत गेले. त्यामुळे नाराजीचा सूर आहे. प्रभाव असलेल्या प्रभागाची चार तुकड्यांत विभागणी झाल्याने काही जणांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. नव्याने जोडलेल्या भागात ओळख निर्माण करण्यासाठी उमेदवारांनी मोर्चा वळवला आहे. गणेशोत्सव हा पहिला संधीचा टप्पा ठरत आहे. यामध्ये काही ठिकाणी संपर्क वाढविला आहे. शुभेच्छा फलकांच्या माध्यमातून आपली छबी मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे.

महायुतीतील पक्ष ‘कुठल्याही गटात या; पण लवकर निर्णय घ्या’ असा दबाव आणत आहेत, तर इच्छुक प्रभाग पाहून निर्णय घेत आहेत. सुरक्षित विभाग मतदारसंघात येईल असा अंदाज बांधून घाईगडबडीने पक्षांतर केलेल्यांना आता फेरविचार करावा लागणार असून दाट लोकवस्ती व झोपडपट्टी भाग जोडल्यामुळे पुन्हा घरवापसी करण्याची वेळ काही उमेदवारांबर येणार आहे. आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे.