Who is Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी (१३ जुलै) सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला. दीपक काटे यांच्यासह शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले. त्यांच्या डोक्यावर, अंगावर काळी शाई टाकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या हल्ल्यावरून निर्माण झालेला वाद आता चिघळत आहे. अटक करण्यात आलेले भाजपा नेते दीपक काटे मराठा आहेत. ज्यांच्यावर हा हल्ला झाला ते प्रवीण गायकवाडदेखील मराठा आहेत. त्यांच्यावरील हल्ल्यामुळे मराठा संघटनांना भाजपाच्या मराठा प्रश्नांप्रती असलेल्या गांभीर्याबद्दल पुन्हा शंका निर्माण झाली आहे. नेमकं हे प्रकरण काय? या मुद्द्यावरून महराष्ट्रातील राजकारण आणखी तापणार का? कोण आहेत प्रवीण गायकवाड आणि दीपक काटे? जाणून घेऊयात.

गायकवाड यांच्यावर हल्ला

  • गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्याच्या एक दिवसानंतर मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या अनेक संघटनांनी पुण्यात बंद दाराआड बैठक घेतली.
  • भाजपा सुरुवातीला काटे यांच्यावर कारवाई करण्यापासून मागे हटत असल्याचे दिसून आले, तसेच त्यांचे चंद्रकांत बावनकुळे यांच्याबरोबरचे फोटोही चर्चेत आले होते.
  • भाजपाचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनीही या हल्ल्याला विरोध दर्शविल्याने अखेर काटे यांना अटक करण्यात आली.
  • गायकवाड सोलापूर जिल्ह्यात फत्तेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी गेले असता काटे यांच्या नेतृत्वाखालील शिवधर्म फाउंडेशनच्या सदस्यांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यावर शाई फेकली.
  • काटे यांनी त्यांच्या संभाजी ब्रिगेडच्या नावात ‘छत्रपती’ न जोडल्याबद्दलच्या रागातून हे कृत्य केल्याचे स्पष्ट केले आणि हे अपमानजनक असल्याचे म्हटले.
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी (१३ जुलै) सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

प्रवीण गायकवाड कोण आहेत?

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे राहणारे प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत आणि सध्या ते प्रदेशाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. गायकवाड हे त्यांच्या आक्रमक राजकारणासाठी ओळखले जातात. त्यांनी मराठ्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्या हाताळणारे नेते म्हणून स्वतःची ओळख तयार केली आहे. त्यांचे मोठ्या संख्येने समर्थक आहेत. २००४ मध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटची तोडफोड केल्यानंतर संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीझोतात आले होते. जेम्स लेन यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकामुळे वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात हा हल्ला झाला होता. या हल्ल्यात संस्थेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले होते आणि दुर्मीळ पुस्तके आणि हस्तलिखिते यांचीही नासधूस झाली होती.

केंद्रातील एनडीए सरकारचे नेतृत्व करणारे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता. त्यानंतर राज्य सरकारने संभाजी ब्रिगेडवर कडक कारवाई केली होती आणि संघटनेवर बंदी घातली. तसेच या संघटनेच्या ७२ सदस्यांना अटक केली होती. परंतु, ही बंदी प्रत्यक्षात कधीच लागू करण्यात आली नाही. इतकेच नव्हे तर पुण्यातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यासाठी संभाजी ब्रिगेडने निदर्शने केली. दादोजी कोंडदेव यांना काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु) मानतात. काही ब्राह्मण विद्वानांनी कोंडदेव यांना गुरु म्हणून चित्रित केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला. २०१० मध्ये निषेध म्हणून ३० ते ४० संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांच्या गटाने महापौर कार्यालयावर हल्ला केला होता.

संभाजी ब्रिगेडच्या मागणीपुढे झुकून त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने तथ्ये पडताळण्यासाठी एक समिती स्थापन केली आणि नंतर शालेय इतिहासाच्या पुस्तकांमधून कोंडदेव यांचे नाव काढून टाकले. याचे कारण म्हणजे त्यांना ते शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. मात्र, इतिहासकार आणि विद्वानांनी या निर्णयावर तीव्र टीका केली. शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना घेराव घातल्यानंतर आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळी शाई लावल्यानंतर संभाजी ब्रिगेडने राज्यभर निदर्शने केली. परंतु, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव टाळता आला.

दीपक काटे कोण आहेत?

शिवधर्म फाउंडेशनची स्थापना २०१६ ते १७ मध्ये राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखालील आंदोलनाच्या सुमारास झाली असे मानले जाते. एका मराठा मुलीवर बलात्कार झाला होता, त्याविरोधात निदर्शने झाली आणि याचदरम्यान निदर्शने चिघळली आणि मराठा आरक्षणाची मागणीही वाढली. त्याचवेळी शिवधर्म फाउंडेशनची स्थापना झाली. २०२० मध्ये दिपक काटे यांनी ‘संभाजी बीडी’ विरोधात एक प्रसिद्ध मोहीम राबवली. त्यात त्यांनी म्हटले होते की, तंबाखू विकणाऱ्या कंपनीने आपला ब्रँड छत्रपती संभाजी महाराजांशी जोडू नये. कंपनीने अखेर आपले नाव बदलून साबळे बीडी असे ठेवले. या वर्षी जानेवारीमध्ये पुण्याहून हैदराबादला जाताना सुरक्षा तपासणीदरम्यान काटे यांच्या बॅगेत ७.६५ मिमी कॅलिबरच्या २८ जिवंत गोळ्या आणि दोन मॅगझिन आढळून आल्या. त्यांच्याविरोधात भारतीय शस्त्र कायद्यांतर्गत पुण्यातील पोलिस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली, पण नंतर जामिनावर त्यांची सुटका झाली. काटे यांनी दावा केला की, कोणीतरी त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्या बॅगेत गोळ्या ठेवल्या होत्या.

या हल्ल्याचा महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार?

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर मनोज जरांगे पाटील, सकल मराठा समाज आणि मराठा महासंघ यांसारखे गट शांत झाले होते. या गटांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मागील महायुती सरकारवर दबाव आणला होता. भाजपाशी संबंधित एका ज्येष्ठ मराठा नेत्याने म्हटले की, काटे यांच्या हल्ल्यामुळे पक्षाविरुद्धचा अविश्वास पुन्हा उफाळून येऊ शकतो. गायकवाड यांनी त्यांच्यावरील हल्ल्याचा संबंध सरकारने रचलेल्या एका सुव्यवस्थित कटाशी जोडला. त्यांनी विशेषतः फडणवीसांवर आरोप केले आणि त्यांच्याकडे गृहखाते असल्याचे नमूद केले.

गायकवाड म्हणाले, “आम्ही शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारसरणीवर विश्वास ठेवतो, परंतु उजव्या विचारसरणीचे लोक मनुस्मृती आणू इच्छितात.” आणखी एक ज्येष्ठ मराठा नेते पुरोषत्तम खेडेकर म्हणाले, “प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला हा एका व्यक्तीवरील हल्ला नाही. मराठा, बहुजन आणि गरिबांच्या कल्याणासाठी एकत्र येण्यासाठी सर्व समान विचारसरणीच्या पक्षांना आणि संघटनांना हा एक इशारा आहे.” राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवधर्म फाउंडेशनच्या निषेधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले, “आम्ही कोणत्याही स्वरूपाच्या हिंसाचाराला तीव्र विरोध करतो.” सोमवारी विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या हल्ल्याचे वर्णन प्रवीण गायकवाड यांच्यावरील हत्येचा प्रयत्न असे केले. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काटे यांच्या अटकेची घोषणा केली. ते म्हणाले, “राज्य कायदा आणि सुव्यवस्थेने चालते. कोणत्याही व्यक्तीने केलेल्या हिंसाचाराच्या कृत्यावर कडक कारवाई केली जाईल.” बावनकुळे यांच्यावरही काटे यांच्याशी असलेल्या त्यांच्या कथित संबंधांमुळे टीका होत आहेत. मात्र, बावनकुळे म्हणाले, “भाजपा कधीही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला मान्यता देत नाही, शिवधर्म कार्यकर्त्यांच्या कृत्याशी आमचा काहीही संबंध नाही.”