छत्रपती संभाजीनगर : पदवीधर मतदारसंघाची पुनर्रचनेचा विषय नसल्यामुळे परिसिमन आयोगाचे निकष औरंगाबाद पदवीधर मतदारसंघास लागू पडत नाहीत. त्यामुळे या मतदारसंघाचे नाव छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ असे करावे, अशी मागणी करण्याच्या हालचाली भाजपकडून केल्या जात आहेत. या मतदारसंघात पूर्वी नोंदणी प्रमूख म्हणून काम करणाऱ्या प्रवीण घुगे यांनी अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करणार असल्याचे सांगितले. या मतदारसंघाची पुनर्रचना करायची नाही. त्यामुळे परिसिमन आयोगाचे निकष यास कसे लागू पडतील, असा प्रश्न घुगे यांनी विचारला आहे.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीस अद्याप वर्षभरापेक्षा अधिकचा काळ असला तरी नोंदणी प्रक्रियेस सुरूवात झाल्याने विविध पक्षात या अनुषंगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. भाजपने पदवीधर मतदारसंघातील मतदारनोंदणीसाठी आमदार संजय केनेकर यांची नियुक्ती केली आहे. या मतदारसंघात उत्सुक असणाऱ्याची भाजपमध्ये मोठी यादी आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, प्रवीण घुगे यांच्यासह विविध अनेकजण इच्छुकांच्या यादीमध्ये आहेत. नाव बदलण्याचा प्रश्न हाती घेणारे प्रवीण घुगे म्हणाले, ‘ या मतदारसंघाचे नाव बदलण्यात यावे अशी आमची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगर मराठवाडा पदवीधर मतदार संघ असे यास संबोधायला हवे. तसा पाठपुरावा निवडणूक आयोग व केंद्र व राज्य शासनाकडे करणार आहोत. औरंगाबाद हे नाव बदलण्यात आल्यानंतरही तेच नाव ठेवण्याचे काही कारण नाही. ’

सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या या गटातून त्या गटात गेलेले सतीश चव्हाण यांनी मतदार नोंदणीसाठी यंत्रणा उभी करायला सुरुवात केली आहे. या मतदारसंघात मतदार म्हणून नाेंदणी करुन घेण्यासाठी मोठी यंत्रणा पक्षीय पातळीवर उभी केली जाते. एवढे वर्ष यात सतीश चव्हाण यांनी यात आघाडी घेतलेली होती. मात्र, नोंदणीसाठी आता वर्षभराचा कालावधी मिळणार असल्याने अनेक पक्ष आणि उमदेवार मतदारसंघाची चाचपणी करू लागले आहेत.

राजेश टोपे यांच्याकडूनही चाचपणी

घनसावंगी मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनीही या मतदारसंघात उमेदवार म्हणून उतरावे अशी गळ त्यांना घातली जात आहे. त्यांनी या निवडणुकीत उतरावे असा आग्रह केला जात आहे. त्यामुळेच राजेश टोपे यांनी निवडणूक मतदार नोंदणी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सदस्य नरेंद्र काळे हेही उमेदवार म्हणून इच्छूक असले तरी राजेश टोपे हे मतदार नोंदणीसाठी यंत्रणा उभी करू शकतात. त्यामुळे त्यांनी या कामी पुढकार घ्यावा, अशी आमची मागणी असल्याचे काळे यांनी ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना सांगितले.

कॉग्रेसही इच्छूक

कॉग्रेसनेही या मतदारसंघात आपली ताकद उभी करता येईल का, अशी चाचपणी केली जात आहे. निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के देशमुख हे पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पदवीधर मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत असताना या मतदारसंघाचे नाव बदलण्याची मागणी प्रवीण घुगे यांनी केली आहे.